Nagar | चिन्ह धनुष्यबाण असले तरी उमेदवार भाजपचा

नगर, (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस बाकी असतांना सोमवारी रात्री उशीराने महायुतीत जिल्ह्यातील तीन जागांचा तिढा सुटला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला तिन्ही जागा सोडण्यात आल्या आहे.
संगमनेर व नेवासे हे दोन्ही मतदारसंघ शिंदे गटाकडे असले तरी उमेदवारी मात्र भाजपच्या पदाधिकार्यांना देण्यात आली आहे. या पदाधिकार्यांचा पक्षप्रवेश करून त्यांना सकाळी हेलिकॉप्टरने पक्षाचा एबीफॉम देण्यात आला आहे. त्यामुळे चिन्ह धनुष्यबाण असले तरी उमेदवार मात्र भाजपचे आहे. या जागा जर भाजपकडे आल्या असत्या तर उमेदवार हे असते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तळ ठोकून असलेले माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचे संगमनेरमधून निवडणूक लढण्याचे स्वप्न सध्या तरी भंगले आहे. ते किंवा विधानसभा प्रमुख अमोल खताळ यांना उमेदवारी भाजपकडून मिळणार असे वाटत होते. परंतू ही जागा शिंदे गटाला देण्यात आली असून उमेदवारी अमोल खताळ यांना मिळाली आहे.
ते शिवसेनेच्या चिन्हावर संगमनेर मतदारसंघात काँग्रेेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. संगमनेरप्रमाणे नेवासे मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे.
या मतदारसंघातून शिंदे गटाकडून प्रभाकर शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र ही जागा भाजप सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे शिंदे गटाचे धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन लंघे हे आमदार शंकरराव गडाख यांच्या विरोधात उमेदवारी लढणार आहेत.
संगमनेर व नेवासे मतदारसंघात खताळ व लंघे हे दोघेही विखे समर्थक आहेत. त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांनी आपल्या दोन्ही समर्थकांना उमेदवारी दिली आहे. अर्थात चिन्ह मात्र कमळ नाही. तर धनुष्यबाण आहे.
महाविकास आघाडीकडून संगमनेर व नेवासे मतदारसंघाचे उमेदवार निश्चित झाले तरी महायुतीचा घोळ सुरू होता. या दोन जागांचा सस्पेन्स वाढला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस बाकी असतांना उमेदवार कोण असा प्रश्न होता. पंरतू रात्री उशीराने शिंदे गटाने संगमनेर, नेवासा, श्रीरामपूर या तिन्ही मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले.
वाढत्या सस्पेन्समुळे संगमनेरमध्ये तगडा उमेदवार असेल. आ. थोरातांना मतदारसंघाबाहेर पडणे अवघड होईल, असे वाटले होते. परंतू महायुतीने अमोल खताळ यांना उमेदवारी दिल्याने आ. थोरात यांना आता मतदारसंघाबाहेर राज्यात प्रचार करणे सोपे झाल्याची चर्चा आहे. अर्थात खताळ यांच्यामागे विखेंची संपूर्ण यंत्रणा असल्याने आ. थोरात यांना संगमनेरमध्ये कष्ट तर द्यावे लागतील, अशी स्थिती आहे.





