Pune | पुण्यासह नाशिकलाही हुडहुडी

पुणे, – राज्यातील पुणे शहरासह अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा गारठला आहे. अहिल्यानगरमध्ये सर्वांत कमी ११ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील मध्य महाराष्ट्रासह कोकण-गोवा आणि विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
महाबळेश्वरमध्ये थंडीचा पारा १३.९ अंश सेल्सिअस इतका आहे. त्यापेक्षा पुणे, अहिल्यानगर, नाशिक, नागपूर, मालेगाव आणि ब्रह्मपुरी येथे सर्वांत कमी तापनाची नोंद झाली. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. अवकाळी पावसामुळे मागील आठवड्यात कमाल व किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र, या आठवड्यात किमान तापमानात तीन ते चार अंशाने घट झाल्यामुळे थंडीचा कडाका वाढलेला आहे.
पहाटे धुके पडत असून, पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट होण्याची शक्यता असल्याने थंडीचा जोर वाढणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.





