१) पार्थ पवारांचा पाय आणखी खोलात; आणखी एक मोठा जमीन गैरव्यवहार उघड : मुंढवा येथील जमिनीच्या गैरव्यवहारानंतर आता पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज कंपनीचा आणखी एक जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. बोपोडी येथील शासनाच्या मालकीच्या ५ हेक्टर जमिनीचा अपहार करून बेकायदेशीररीत्या खाजगी ताबा दर्शविण्याच्या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात तहसीलदारासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजून ४१ मिनिटांनी नोंदविण्यात आला. याप्रकरणी पुणे शहराचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. शासकीय जमिनीचा अपहार झाल्याचा ठपका ठेवत, त्यांची वर्तणूक बेजबाबदारपणाची आणि शासकीय अधिकाऱ्याला अशोभनीय असल्याची निरिक्षण शासनाने नोंदविले आहे. २) शब्द पाळला नाही, तर एकही रेल्वे धावणार नाही; बच्चू कडूंचा सरकारला इशारा : राज्य सरकारने ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे. दिलेला शब्द किंवा आश्वासन मुदतीत पाळले नाही, तर १ जुलैपासून महाराष्ट्रातील एकही रेल्वे लोहमार्गावर धावू देणार नाही, असा इशारा प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात राज्य सरकार ३० जूनपर्यंत निर्णय घेणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना बँकांकडून तगादा लावला जात आहे, नवीन कृषी कर्जाबाबत अडवणुकीचे प्रकार सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. ३) जमीन प्रकरणातील ‘त्या’ दस्तावर पार्थ पवारांची सही? सुषमा अंधारेंनी पुरावाच दाखवला : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळा प्रकरणावरून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून १८०० कोटींचे बाजारभाव असणारी जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदी करण्यात आली, असा आरोप होत आहेत. तशी कागदपत्रे समाजमाध्यमातून समोर येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट लिहून जमीन प्रकरणातील पार्थ पवार यांची सही असलेला एक कागदपत्राचा फोटो शेअर केला आहे. यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याची चर्चा होत आहे. ४) मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी; जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसणारे मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कट रचल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जालना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आज मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी हा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘राज्यातील जनतेसमोर एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोर. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी तो मेळावा घेतला. राज्यात जातीय वातावरण कोण तयार केले. बीड जिल्ह्यात ओबीसी मधल्या अनेकांची घर जाळली ही प्रवृत्ती कोणाची, असं धनंजय मुंडे म्हणाले. ५) हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ: जमीन घोटाळ्याप्रकरणी होणार कारवाई : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते भूपिंदर सिंग हुडा यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. मानेसर जमीन घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हुडा यांची याचिका फेटाळून लावत हा आदेश जारी केला आहे. हुडा यांनी याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये म्हटले होते की या प्रकरणातील इतर आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे. त्यांच्याविरुद्ध एकट्याने खटला चालवणे योग्य नाही. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. हुडा यांच्याविरुद्ध आता पंचकुला याठिकाणी सीबीआय विशेष न्यायालयात आरोप निश्चित केले जातील. ६) भारतसोबतचे संबंध सुधारण्यास सुरुवात होऊ शकते..; महान नेता म्हणत ट्रम्पकडून मोदींचे कौतुक : गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर शुल्क लादले, परंतु आता अमेरिकेचा सूर बदललेला दिसत आहे. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यात संवाद सुरु असल्याचे म्हटले आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे जवळजवळ बंद केले आहे. ते (पंतप्रधान मोदी) माझे खूप चांगले मित्र आहेत आणि आम्ही वारंवार बोलत असतो. मी लवकरच भारतात जाईन. पंतप्रधान मोदी एक महान नेते आहेत.” असे म्हणत ट्रम्प यांनी भारतात येण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प पूर्वी भारताबद्दल बरेच कठोर दिसत होते, परंतु आता त्यांची भूमिका मऊ झाली आहे. ७) ‘वंदे मातरम’ गीताची काही कडवी काँग्रेसने वगळली होती; पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका : ७ नोव्हेंबर २०२५ हा एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. आज आपण ‘वंदे मातरम’ची १५० वी वर्धापन दिन साजरा करत आहोत. हा शुभ प्रसंग आपल्याला नवीन प्रेरणा देईल आणि लाखो देशवासीयांना नवीन उर्जेने भरेल. इतिहासात या दिवसाचे स्मरण करण्यासाठी, आज ‘वंदे मातरम’ ला समर्पित एक विशेष नाणे आणि टपाल तिकिट देखील जारी करण्यात आले. पण एकूण पाहता ता राष्ट्रीय गीतावर अन्यायच जास्त झाला. अनेक वर्षांनी वंदे मातरमच्या कडव्यांमधील आत्मा हरवला. या गीताची काही कडवी काॅंग्रेसने वगळली होती, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गाण्याच्या वर्षभराच्या स्मरणोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. ८) विकी कौशलच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म : दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. विकीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये आशीर्वाद आणि ॐ असे कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या चर्चा सुरू होत्या. कतरिना आणि विकी कौशलने २३ सप्टेंबरला सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. अखेर कतरिनाने एका गोंडस बाळाला आज ७ नोव्हेंंबर रोजी जन्म दिला आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे कतरिना आणि विकी दोघांचाही आनंद गगणात मावेनसा झाला आहे. ९) श्रीकांत तिवारी परतला..! ‘द फॅमिली मॅन 3’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज : अभिनेता मनोज बाजपेयीची मुख्य भूमिका असलेली बहुप्रतिक्षित वेबसिरीज द फॅमिली मॅन ३ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. वेबसिरीजमध्ये मनोज बाजपेयी गुप्तहेर श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत पुन्हा परतला असून, नव्या सीझनमध्ये काही नव्या कलाकारांची देखील एन्ट्री झाली आहे. अमेझॉन प्राइम या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या या सिरीजचा ट्रेलर २ मिनिटे ४९ सेकंदांचा असून, ट्रेलरची सुरुवात श्रीकांतने त्याच्या कुटुंबाला तो एक गुप्तहेर असल्याचे सांगून केली आहे. यानंतर पुढे श्रीकांतला वॉन्टेड घोषित करण्यात येते. अशी सर्वसाधारण कथा वेबसिरीजची असल्याचे ट्रेलर पाहून समजते. पण श्रीकांत नेमक्या कोणत्या चक्रव्यूहात अडकला आहे, यासाठी २१ नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे. १०) महाराष्ट्राच्या ३ लेकींसह कोच मुझुमदार वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार : शुक्रवारी, विश्वविजेत्या भारतीय महिला संघाचा भाग असलेल्या महाराष्ट्रातील तीन खेळाडू स्मृती मानधना, राधा यादव आणि जेमिमा रॉड्रिग्ज आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचा मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. याआधी महाराष्ट्र सरकारने या तिन्ही खेळाडूंना प्रत्येकी २.२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, तर संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना २२.५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या सत्कार सोहळ्यात बक्षिसाची ही रक्कम त्यांनी देण्यात आली.