नागपूर : विधानभवनासह अधिवेशनाशी संबंधित सर्व इमारतींच्या वीजपुरवठ्याची चाचणी पूर्ण झाली असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी विशेष मनुष्यबळ तसेच पर्यायी जनरेटर प्रणाली उभारण्यात आली आहे. विधानमंडळ परिसरात पार्किंग स्लॉटची व्यवस्था करण्यात आली असून वाहतूक सुसूत्रिकरणाबाबत संबंधित यंत्रणांना स्पष्ट दिशा देण्यात आली. विधानभवनात हिरकणी कक्षाचीही व्यवस्थ करण्यात आली असल्याची माहिती विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी रविवारी दिली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या २०२५ च्या (हिवाळी) अधिवेशनासाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज आहेत याची खात्री करण्यासाठी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल विधानभवनात सविस्तर आढावा बैठक घेतली. राम शिंदे म्हणाले, अधिवेशन कालावधीत दूरध्वनी, इंटरनेट व वायफाय सेवा अखंडित सुरू राहतील. नागभवन, रविभवन व आमदार निवास येथे २४ तास अॅम्ब्युलन्स तसेच अतिरिक्त वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी विधानभवन परिसरातील आतल्या-बाहेरच्या सुरक्षा बंदोबस्ताचा आढावा घेऊन आवश्यक पोलिस पथके तैनात केली आहेत. अधिवेशनात व्हीआयपींना भेटण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी ‘पास’ सक्तीने घ्यावा लागेल, असे स्पष्ट करतानाच विनापास प्रवेशाची समस्या रोखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असल्याचे त्यांनी सांगितले.