Jamkhed News : शहरातून संथ गतीने होत असलेल्या जामखेड – सौताडा महामार्गाचे काम पुन्हा एकदा चालू करण्यात आले आहे. समर्थ हॉस्पिटल पासून ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत एकाबाजूने वाहतूक सुरु असल्याने खर्डा चौकापर्यंत रस्त्यावर रोज होणारी वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. हा रास्ता संयमाची कसोटी पाहणारी ठरत आहे. वाहतूक कोंडी होत असून एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तासभराचा वेळ लागत असल्याने जामखेडकर वैतागले आहेत. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून कोंडीच्या रोजच्या कटकटीमधून सुटका व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अवघ्या १० ते १२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम तीन वर्षांपासून सुरु असून कामही निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप होत आहे. तीन वर्ष पूर्ण होऊनही जामखेड-सौताडा महामार्गाचे काम अद्यापपर्यंत अपूर्णच असून, धुळीचा सर्वाधिक त्रास जामखेडकरांना सहन करावा लागत आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेले जामखेड-सौताडा रस्ता दळणवळणासाठी महत्त्वाचा असतानाही तो रस्ता पूर्ण होताना दिसत नाही. या महामार्गाचे काम जवळपास ६० टक्के पूर्वतास आले असून अतिक्रमणे न काढताच रस्त्याचे काम सुरु केले आहे. शहरातील काम अर्थवट अवस्थेत रखडून ठेवण्यात आले आहे. यापैकी समर्थ हॉस्पिटल ते ग्रामीण रुग्णालयापर्यंतच्या कामाला सुरवात झाली आहे. एका बाजूने वाहतूक चालू असल्याने गेल्या आठ दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी उदभवली असून पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. हा महामार्ग मराठवाड्याला जोडणारा महत्त्वपूर्ण मानला जातो. असे असतानाही ठेकेदार कंपनी या रस्ताकामाकडे दुर्लक्ष करत असून, तीन वर्ष झाले तरी रस्ताकाम अपूर्णावस्थेत आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पालकमंत्री, खासदार, दोन आमदार असतानाही रस्ता पूर्ण होत नसल्याबाबत नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे जामखेड-सौताडा महामार्गाचे काम लवकर पूर्ण होईल, अशी आशा नागरिकांची होती. मात्र, ती फोल ठरली. आता निवडणुका झाल्यामुळे रस्ताकामाला गती मिळत नसल्याची खंत नागरिकांतून बोलून दाखविण्यात येत आहे. आ. रोहित पवार व सभापती राम शिंदे यांनी रस्ताकामाबाबत टाळाटाळ केल्याचीही नागरिकांत चर्चा आहे.