All India Grahak Panchayat – छापील कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) या संकल्पनेच्या नावाखाली कंपन्यांकडून ग्राहकांची उघड लूट सुरू असल्याचा आरोप करत अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. 25 मे रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे देशव्यापी सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष तथा राष्ट्रपती पुरस्कार विजेते बाळासाहेब औटी यांनी केली. या संदर्भात महाराष्ट्र राज्याची विशेष ऑनलाइन बैठक पार पडली. बैठकीस केंद्रीय कार्यकारी सदस्य सूर्यकांत पाठक, संघटनमंत्री संदीप जंगम, प्रांत सचिव अनिल देशमुख, विलास जगदाळे तसेच ज्ञानेश्वर उंडे उपस्थित होते. यावेळी ग्राहकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बाळासाहेब औटी म्हणाले, आज छापील किंमत ही ग्राहक संरक्षणासाठी नसून कंपन्यांच्या नफेखोरीचे साधन बनली आहे. उत्पादन खर्च अत्यल्प असतानाही अनेक वस्तूंवर अवास्तव किंमत छापली जाते आणि ग्राहकांकडून कायदेशीर पद्धतीने लूट केली जाते. सामान्य नागरिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारकडे विविध मागण्या करण्यात येणार आहेत. प्रत्येक वस्तूवर उत्पादन मूल्य छापणे सक्तीचे करणे, प्रथम विक्री किंमत स्पष्ट नमूद करणे, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंवरील नफ्याची मर्यादा निश्चित करणे, छापील कमाल किरकोळ किंमतीसाठी स्वतंत्र कायदा तयार करणे तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करणे, अशा प्रमुख मागण्या आंदोलनातून मांडल्या जाणार आहेत.दरम्यान, सोमवार दि. 11 मे रोजी राज्यभरातील जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. तसेच गुरुवार दि. 21 मेपासून कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना होणार असून पुणे जिल्ह्यातून सुमारे शंभर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती ज्ञानेश्वर उंडे यांनी दिली.