पुणे | शहरातील सर्वच डाॅक्टरांचा आज संप

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोलका ता येथील वैद्यकीय विभागातील विद्यार्थीनीवर अत्याचार करून केलेल्या हेत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे (आएमए) यांच्या वतीने शनिवारी (दि. १७) वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे पुढील २४ तास अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवा वगळता बाह्यरूग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद असतील. त्याला खासगी रुग्णालयांनीही पाठिंबा दिल्याचे आएमएचे अध्यक्ष डाॅ. राजन संचेती यांनी सांगितले.
कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली.
या घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला मोठा धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला असून, आता इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत.
दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी येथील वैद्यकीय महाविद्यालयात जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला.
त्यामुळे या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
त्याला पुण्यातील डॉक्टरांच्या सर्व असोसिएशन तसेच पुण्यातील मोठ्या व कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या संघटनेने आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यामुळे पुढील २४ तास सर्व छोटी-मोठी रूग्णालयातील बाह्यरुग्ण सेवा बंद राहील, असे डॉ. राजन संचेती, डॉ. वीरेंद्र ओस्तवाल, डॉ. सचिन लकडे, डॉ. सुनील इंगळे, डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.





