पिंपरी | पूरबाधित भागात जलजन्य आजारांबाबत पालिकेकडून सर्वेक्षण

पिंपरी, (प्रतिनिधी) – अतिवृष्टीमुळे शहरातील नद्यांना पूर आल्याने पाणी घरात घुसल्याने नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले होते. नदीपात्राशेजारील भागात घरोघरी जाऊन वैद्यकीय विभागामार्फत एमपीडब्लयू, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत जलजन्य व कीटकजन्य आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. आजारी असणा-या नागरिकांना औषधे देण्यात आली आहे.
मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीपात्रालगत्या भागात पुराचे पाणी शिरुन जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे पूरबाधित १३६५ नागरिकांना त्या-त्या भागातील महापालिकेच्या शाळा, निवारा केंद्रे, मंदिरांमध्ये स्थलांतरित केले.
त्यासाठी वीस ठिकाणी निवारा केंद्रे तयार करण्यात आली होती. घरामध्ये शिरलेले पुराचे पाणी ओसरल्यानंतर त्या भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय विभागाकडून झोननिहाय १६ पथके तयार केली आहे.
या पथकांतील एमपीडब्ल्यू, आरोग्य सेविका तसेच आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत पूरबाधित परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची तपासणी केली जात आहे. आजारी असणा-या नागरिकांना त्वरीत औषधोपचार दिले जात आहे.
पूरबाधित भागातील घरोघरी जलजन्य व कीटकजन्य आजारांबाबत सर्वेक्षण, जनजागृती केली जात आहेत. पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते यासाठी खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे, अशा सूचना नागरिकांना देण्यात येत आहेत.
त्याचबरोबर आरोग्य विभागाकडून पुरबाधित परिसराची स्वच्छता केली जात आहे. लोकवस्ती, अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ते, नदीपत्रालगतचे रस्ते आदी सार्वजनिक ठिकाणी साचलेला गाळ काढून टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात संसर्गजन्य आजार पसरुन नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
सार्वजनिक शौचालये स्वच्छ केली जात आहेत. संपूर्ण परिसर पाण्याखाली गेल्यामुळे काल सोमवारी आणि मंगळवारी परिसरात विद्युत व्यवस्था पुरविण्यात आली. दिवसभर परिसरात किटकनाशक फवारणी करण्यात आली.
निवारा केंद्रातील नागरिकांना विविध सेवा पुरवण्यात येत आहेत. पालिकेमार्फत पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था, भोजन, औषधोपचार, किटकनाशक औषध फवारणी आदी सेवा दिल्या आहेत.
पुरबाधित भागातील सार्वजनिक शौचालये, रस्ते, चौक स्वच्छ केले. नागरिकांच्या सेवेत कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.- अजिंक्य येळे, सहायक आयुक्त, आरोग्य विभाग




