पिंपरी | रुग्णालयातील चहावाला डाॅक्टर प्रकरणाची गंभीर दखल

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात चहा वाला डॉक्टरच्या वेशात खुर्चिवर बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे वृत्त दैनिक प्रभातने शनिवारच्या (दि. २९) अंकात प्रसिद्ध झाले होते.
त्याची महापालिका वैद्यकीय विभागाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय विभागाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयु्क्तांनी पालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये बाहेरील खाद्यपदार्थ विक्री करण्यास बंदी घातली आहे. मोठे रुग्णालय असेल तर त्याच ठिकाणी कॅन्टीनची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरील चहा, नाष्टा, जेवन विक्री करण्यासाठी येणाऱ्या व्यवसायिकांना बंदी घातली आहे. तरी, जिजामाता रुग्णालयात चहा विक्री करणाऱ्या तरुणाला खुलेआम प्रवेश दिला जात होता.
चहा विक्री करणारा हा तरुण त्याचा व्यवसाय करुन शांत बसला नाही, तर गळ्यात डॉक्टरांचे स्टेथॉस्कोप घालून डॉक्टरांच्या खुर्चिवर बसलेला फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे. संबंधित तरुणाकडून गंभीर प्रकार घडला असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
महापालिका वैद्यकीय विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. संबंधित चहावाला गळ्यात स्टेथॉस्कोप अडकवून खुर्चिवर बसत होता ? की त्याने काही पेशंट तपासले आहेत.
त्यांना चुकीचे इंजेक्शन अथवा औषधे दिली आहेत का ?, याची चौकशी करण्यात येणार आहे. त्यावेळी कर्तव्यावर किती सुरक्षारक्षक होते ?, डॉक्टर कोण होते ?, स्टेथॉस्कोप कोणी दिला ?, याची चौकशी करुन दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे अधिकारी डॉ. गोफणे यांनी सांगितले.





