Nanded Bomb Blast : नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष; १९ वर्षांनी दिला निकाल

Nanded Bomb Blast – संपूर्ण देशभर गाजलेल्या नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणात नांदेड येथील सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची शनिवारी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणातील दोन आरोपींचा स्फोटात, तर एकाचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला होता. याशिवाय दहा जणांवर खटला सुरु होता. या प्रकरणाचा निकाल तब्बल १९ वषार्नंतर लागला आहे. या निकालामुळे सीबीआयला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयीन परिसरात लोकांनी गर्दी केली होती. या निकालाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. नांदेड शहरातील पाटबंधारे नगर भागात ६ एप्रिल २००६ रोजी लक्ष्मण राजकोंडवार यांच्या घरात मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात नरेश राजकोंडवार आणि हिमांशू पानसे यांचा जागीच मृत्यू झाला होता.
तर मारोती वाघ, योगेश देशपांडे, गुरुराज तुप्तेवार व राहूल पांडे हे गंभीर जखमी झाले होते. तर मोठी इमारत असलेल्या घरात हा स्फोट झाल्याने घरातील साहित्य छिन्नविछिन्न झाले होते. गेल्या अनेक वर्षातील ही मोठी घटना असल्याने संपूर्ण देशभरात गाजली होती. सुरुवातीला हा स्फोट फटाक्यांचा असल्याचे मानले जात होते. परंतु दुस-या दिवशी घराची तपासणी घेतल्यानंतर हे गंभीर प्रकरण एटीएसकडे देण्यात आले.
यानंतर हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान आरोपींचा संबंध पूर्णा, परभणी आणि जालना येथील बॉम्बस्फोटांशी असल्याचे पुढे आले. या प्रकरणात सीबीआयने २ हजार पानांची चार्जशीट तयार केली होती. त्यात बारा जणांना आरोपी करण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्या. सी. व्ही. मराठे यांनी या खटल्यात ४९ साक्षीदार तपासले.
त्यात सीबीआय पाटबंधारे नगर येथील त्या घरात बॉम्बस्फोट झाल्याचे सिद्धच करु शकली नाही. त्या ठिकाणी फटाक्यांचा स्फोट झाला होता? हे ग्राहय धरुन न्यायालयाने सर्व आरोपींची शनिवारी ४ रोजी निर्दोष मुक्तता केली. शनिवारी या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. खटल्यात बचाव पक्षाच्या वतीने ॲड. नितीन रुणवाल यांनी बाजू मांडली.





