Malegaon blast case | ऐतिहासिक निकाल..! मालेगाव स्फोट प्रकरणात 17 वर्षांनंतर सर्व आरोपी निर्दोष; वाचा संपूर्ण घटनाक्रम…

Malegaon blast case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष NIA न्यायालयाने गुरुवार 31 जुलै रोजी ऐतिहासिक निकाल जाहीर करत सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी यांना “पुराव्यांअभावी” दोषमुक्त करण्यात आले.
विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी 1000 पानांचा निकाल वाचताना तपास यंत्रणेच्या अनेक त्रुटींवर बोट ठेवले, ज्यामुळे हा खटला देशातील सर्वात वादग्रस्त प्रकरणांपैकी एक ठरला. निकालानंतर समीर कुलकर्णी यांना न्यायालयातच अश्रू अनावर झाले, तर इतर आरोपींनी “17 वर्षांनी पुनर्जन्म झाल्यासारखे वाटत आहे” अशा भावना व्यक्त केल्या.
नेमकं काय घडलं?
29 सप्टेंबर 2008 साली राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रात्रीच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला. त्यामुळेच जखमींची संख्या जास्त होती. घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, 30 सप्टेंबर 2008 साली, मालेगावच्या आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी या लोकांचा या घटनेच्या मागे हात होता अशी माहिती समोर आली होती.
गेल्या 17 वर्षापासून याप्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सुरुवातीला ATS कडे हा तपास होता, नंतर एनआयएकडे हा तपास वर्ग करण्यात आला. एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन देखील मंजूर केला होता. अखेर आज या खटल्याचा निकाल समोर आला असून पुराव्यांअभावी 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
न्यायालयाने तपास यंत्रणेवर ओढले ताशेरे
- ATS ने दावा केला होता की, स्फोटात वापरलेली LML फ्रीडम मोटारसायकल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मालकीची होती. मात्र, ती रामचंद्र कालसंग्रा याच्या ताब्यात होती, आणि स्फोटक मोटारसायकलवर ठेवल्याचा ठोस पुरावा सादर झाला नाही.
- कर्नल प्रसाद पुरोहित यांनी जम्मू-काश्मीरमधून RDX आणल्याचा ATS चा दावा होता, परंतु याचा कोणताही ठोस पुरावा NIA ला सादर करता आला नाही.
- मोक्का (MCOCA) अंतर्गत घेतलेले जबाब 2017 मध्ये हटवल्यानंतर निरुपयोगी ठरले. UAPA अंतर्गत मान्यता चुकीची असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
- 323 साक्षीदारांपैकी 37 फितूर झाले, तर 26 मृत्यूमुखी पडले. काही साक्षीदारांनी ATS कडून जबरदस्तीने जबाब घेतल्याचा दावा केला.
- स्फोटाचा कट रचण्यासाठी फरीदाबाद, भोपाळ आणि नाशिक येथे बैठका झाल्याचा ATS चा दावा सरकारी पक्षाला सिद्ध करता आला नाही.
12 जणांवर आरोप, मात्र सात जणांवरच खटला
1. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (माजी खासदार, भाजप)
2. लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित
3. निवृत्त मेजर रमेश उपाध्याय
4. अजय राहिरकर
5. सुधाकर द्विवेदी (उर्फ स्वामी अमृतानंद देवतीर्थ)
6. समीर कुलकर्णी
7. सुधाकर चतुर्वेदी
रामचंद्र कालसंग्रा, शामजी साहू, संदीप डांगे, प्रवीण तकलकी आणि राकेश धावडे हे पाच जण फरार आहेत. साध्वी प्रज्ञा यांना 2017 मध्ये, तर कर्नल पुरोहित यांना सुप्रीम कोर्टाने “राजकीय कुरघोडी”चा बळी ठरल्याचे नमूद करत जामीन दिला होता.
मालेगाव बॉम्बस्फोट संपूर्ण घटनाक्रम ?
- 29 सप्टेंबर 2008 : मालेगावच्या भिक्खू चौकात स्फोट, 6 ठार, 101 जखमी.
- ऑक्टोबर-नोव्हेंबर 2008 : साध्वी प्रज्ञा (23 ऑक्टोबर) यांच्यासह 11 जणांना अटक.
- 2011 : तपास NIA कडे हस्तांतरित.
- 2016 : NIA ने साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्ध पुरावे अपुरे असल्याचा अहवाल, परंतु विशेष न्यायालयाने खटला चालवण्याचे आदेश दिले.
- 2018 : सात आरोपींवरील खटल्याला सुरुवात.
- 19 एप्रिल 2025 : सुनावणी पूर्ण, निकाल राखीव.
- 31 जुलै 2025 : सर्व सात आरोपी निर्दोष.




