रेल्वे अपहरणातल्या सर्व २१४ ओलिसांची हत्या; बलुच दहशतवाद्यांचा दावा

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये अलिकडे झालेल्या रेल्वे अपहरणादरम्यान ओलिस घेतलेल्या सर्व २१४ पाक सैनिकांची हत्या करण्यात आल्याचा दावा बलुच लिबरेशन आर्मीने केला आहे. अपहरण करण्यात आलेल्या पाक सैनिकांच्या सुटकेसाठी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या बलुच बंडखोरांच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती.
यासाठी बलुच लिबरेशन आर्मीने पाक सरकारला ४८ तासांची मुदत दिली होती. मात्र पाक सरकार आणि पाक लष्कराने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ओलिस ठावलेल्या सर्व २१४ पाक सैनिकांना फाशी देण्यात आल्याचे बलुच लिबरेशन आर्मीने म्हटले आहे.
जाफर एक्सप्रेसचे अपहरण बलुच दहशतवाद्यांनी केले तेंव्हाच या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या अनेक पाक सैनिकांचे अपहरण केले गेले होते. पाकिस्तान लष्कर आणि प्रॉन्टिअर कॉर्प्सने रेल्वे अपहरणाविरोधात कारवाई केली. दोन दिवस चाललेल्या या कारवाईदरम्यान १९० ओलिसांची सुटका केली गेली. तसेच या कारवाई दरम्यान ३२ दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे पाक लष्कराने म्हटले होते.
मात्र रेल्वेमध्ये सुमारे ५०० प्रवासी होते. यात बहुसंख्य प्रवासी हे पाक लष्करातले आणि निमलष्करी दलातले सैनिक होते. यापैकी २०० पेक्षा जास्त सैनिकांना बलुच दहशतवाद्यांनी अपहरण करून आपल्याबरोबर नेल्याची बाब पाक लष्कराने दडवून ठेवली होती. तसेच बलुच दहशतवाद्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सुटकेसाठी ४८ तासांची मुदत दिल्याचे देखील पाक लष्कराने उघड हो दिले नव्हते. हे बलुच लिबरेशन आर्मीने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट झाले.
पाकिस्तानकडून नेहमीच सत्य दडपले जात असते. तसेच पाक लष्कराच्या उद्दामपणामुळे गंभीरपणे वाटाघाटी केल्या जात नाहीत. यामुळे वस्तुस्थितीकडे नेहमीच डोळेझाक केली जात असते. यामुळे पाकिस्तानच्या २१४ सैनिकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे बलुच लिबरेशन आर्मीच्या निवेदनात म्हटले आहे.
ज्यांची सुटका पाक लष्कराने केली असे सांगितले जात होते, त्यांना खरेतर बीएलएनेच मानवतावादी भूमिकेतून सोडून दिले होते. महिला आणि बालकांनाही अशाच प्रकारे सोडून दिले गेले होते. मात्र पाक लष्कराने हे दडवून ठेवले. २०० ओलिस बीएलएच्या ताब्यात असल्याची बाब देखील अशीच दडवून ठेवली गेली होती. स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी बीएलएचा लढा यापुढच्या काळातही असाच सुरू राहिल, असेही बीएलएने म्हटले आहे.
ऑपरेशन दारा ए बलोच
आपल्या सविस्तर निवेदनामध्ये बलिच लिबरेशन आर्मीने रेल्वे अपहरणाशी संबंधित तपशील जाहीर केला आहे. पाक लष्कराविरुद्धच्या या कारवाईला बलुच लिबरेशन आर्मीने दारा ए बलोच असे टोपण नाव दिले होते. रेल्वे थांबवण्यात आल्यानंतर प्रवाशांच्या सुटकेसाठी पाक लष्कराच्या एसएसजी कमांडोंनी धडक कारवाई सुरू केली होती. यावेळी काही ओलिसांना विशेष डब्यामद्ये कोंडून ठेवण्यात आले होते. कमांडोंना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी काही बंडखोरांनी सांभाळली. तर उर्वरित सदस्य अन्य ओलिसांना बरोबर घेऊन सुरक्षित ठिकाणी निघून गेले. रेल्वेच्या सुटकेसाठीची चकमक तब्बल ७ तास चालल्याचे बीएलएने म्हटले आहे.
बलुच योद्ध्यांच्या बलिदानाचे स्मरण…
पाक लष्कराबरोबरच्या धुमश्चक्रीमध्ये बीएलएचे १२ सदस्य मारले गेले, त्यांना बीएलएने शहिद संबोधून त्यांना आदरांजली वाहिली आहे. बुधवारी १२ योद्धे मारले गेले. कालच्या रात्री आणखी ३ योद्धे हुतात्मा झाले. तर बीएलएच्या मजिद ब्रिगेडचे आणखी ५ योद्धे नंतरच्या लढाईत हुतात्मा झाले. या सर्वांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिल्याचे बीएलएने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन केल्याचा दावा…
आपण नेहमीच युद्धविषयक सर्वमान्य तत्वांचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन केले आहे, असे बीएलएने म्हटले आहे. पाक लष्कराने मात्र आपल्याच सैनिकांच्या जीवाचा त्याग केला. पाक सरकार नेहमीच आपल्या सैनिकांचा वापर युद्ध भडकत ठेवण्यासाठी करत असते. सैनिकांचा जीव वाचवण्यासाठी मात्र कधीच प्रयत्न केला जात नाही. पाक लष्कराला या उद्दामपणाची शिक्षा मिळालीच पाहिजे. यासाठी पाकिस्तानच्या २१४ सैनिकांना प्राण गमवावे लागल्याचे बीएलएने म्हटले आहे.





