Video: पाकिस्तानात चाललंय काय? ट्रेन अपहरणानंतर आता लष्करी तळावर आत्मघाती हल्ला

Pakistan News: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये लष्कर सध्या जाफर एक्स्प्रेसचे अपहरण करणाऱ्या बलूच दहशतवाद्यांशी लढत आहेत, तर दुसरीकडे अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांतातही दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या दहशतवाद्यांनी खैबर पख्तूनख्वाच्या टँक जिल्ह्यातील जंदोला येथे असलेल्या लष्कराच्या फ्रंटियर कॉर्प्स फोर्टवर आत्मघाती हल्ला केला आहे.
हल्ल्यानंतर दहशतवादी आणि लष्करामध्ये जोरदार गोळीबार झाला. लष्कराने टीटीपीच्या 10 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, टीटीपीशी संलग्न फितनाह अल-खावारीज दहशतवाद्यांनी वाहनांमधून आणलेल्या सुधारित स्फोटक यंत्राचा (आयईडी) वापर करून किल्ल्यावर हल्ला केला. या टोळीचे 10 दहशतवादी घटना घडवून आणण्यासाठी आले होते. पाकिस्तानी लष्कराने त्यांच्याशी लढून त्यांना ठार केल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांच्या मृतदेहांचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. मात्र, याची पुष्टी होऊ शकली नाही. परिसरात सुरक्षा दल सतर्क आहेत.
Tahreek Taliban Pakistan terrorist attacked the Frontier Corps Fort in Jandola, Tank, starting with a suicide bombing at the gate, followed by heavy gunfire. Security forces successfully repelled the assault, preventing a breach and killing all 10 TTP Attackers . #Pakistan #TTP pic.twitter.com/BVvyvVuKsq
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) March 13, 2025
ट्रेन अपहरणानंतरची घटना –
बलूच लिबरेशन आर्मी (बीएलए) या दहशतवादी गटाने 11 मार्च रोजी क्वेटा ते पेशावरकडे जाणारी जाफर एक्स्प्रेस ट्रेनचे अपहरण केल्यावर दोन दिवसांनी हा हल्ला झाला आहे. या ट्रेनमध्ये 200 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 450 हून अधिक प्रवासी होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर पाकिस्तानी लष्कराने सुमारे 200 प्रवाशांची सुटका केली असून 50 हल्लेखोरांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. तथापि, बीएलएचे म्हणणे आहे की त्यांनी अद्याप 150 हून अधिक पाकिस्तानी सैनिक त्यांच्या ताब्यात आहेत.
बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा हे दहशतवादाचे केंद्र –
बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा हे पाकिस्तानमधील दहशतवादाचे गड बनले आहेत. दर काही दिवसांनी येथे मोठे हल्ले होत आहेत. TTP या प्रतिबंधित संघटनेची स्थापना 2007 मध्ये झाली होती. ही संघटना अल-कायदाच्या जवळची आहे. 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर पाकिस्तान सरकारसोबत टीटीपीचा युद्धविराम संपुष्टात आला, त्यानंतर पाकिस्तानमध्ये टीटीपीचे दहशतवादी हल्ले वाढले आहेत.





