नवी दिल्ली – फिनलंडमध्ये अध्यक्षपदासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत माजी अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना निसटता विजय मिळाला असून ते आता देशाच्या अध्यक्षपदी निवडले गेले आहेत. ते मार्च महिन्यात फिनलंडच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. फिनलंड अलिकडेच नाटोचा सदस्य बनलेला देश असल्यामुळे
देशाच्या परराष्ट्र सुरक्षा विषयक धोरणांना ते नवीन आकार देतील अशी आशा व्यक्त केली जाते आहे.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्टब यांच्या मध्यममार्गी उजव्या विचारसरणीच्या नॅशनल कोएलेशन पार्टीला ५१.६ टक्के मते मिळाली.
तर अपक्ष उमेदवार आणि माजी परराष्ट्र मंत्री पेक्का हाविस्टो यांना ४८.४ टक्के मते मिळाली. निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत हे दोघे प्रमुख दावेदार होते. हाविस्टो यांनी २०१९ ते २०२३ पर्यंत फिनलंडचे सर्वोच्च मुत्सद्दी म्हणून काम केले होते.
फिनलंडचे लोकप्रिय अध्यक्ष साउली निस्ट यांचा ६ वर्षांचा दुसऱ्या टर्मचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे. त्यांच्या जागेवर स्टब हे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. अध्यक्ष निवडीसाठी २८ जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या फेरीत मूळ नऊ उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराला बहुमत न मिळाल्याने दुसऱ्या फेरीचे मतदान घेणे आवश्यक झाले होते. फिनलंडच्या अध्यक्षांकडे सरकारसह परराष्ट्र आणि सुरक्षा धोरण तयार करण्याचे कार्यकारी अधिकार आहेत.