AUS vs ENG : ॲशेसमध्ये ‘टेक्निकल’ राडा! आऊट असूनही दिले ‘नॉट आऊट’; कंपनीनेही मान्य केली चूक, पाहा VIDEO

Alex Carey Controversy Video Viral : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित ‘ॲशेस’ मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. अॅडलेड ओव्हलवर सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज अॅलेक्स कॅरी याच्या विकेटवरून तंत्रज्ञानाचा असा काही गोंधळ उडाला की, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी विचित्र घटना पाहायला मिळाली. या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
७२ धावांवर झाला होता झेलबाद, पण…
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची फलंदाजी सुरू असताना, अॅलेक्स कॅरी ७२ धावांवर खेळत होता. त्यावेळी इंग्लंडचा गोलंदाज जोश टंगच्या चेंडूवर तो झेलबाद झाल्याचे अपील झाली. मैदानावर पंचांनी त्याला ‘नाबाद’ दिले, परंतु इंग्लंडला खात्री असल्याने त्यांनी रिव्ह्यू (DRS) घेतला. स्निकोमीटरमध्ये चेंडू बॅटला लागण्यापूर्वीच एक ‘स्पाइक’ (हालचाल) दिसली, मात्र चेंडू बॅटजवळून जाताना कोणतीही हालचाल दिसली नाही. याच तांत्रिक त्रुटीमुळे तिसऱ्या पंचांनी कॅरीला नाबाद घोषित केले.
कंपनीने मान्य केली चूक: ऑपरेटरने घातला गोंधळ –
A Day Without Cheating is A Day Wasted for Australia. There was no way this wasn’t out. It’s 100 percent out. Australia uses low quality Ultraedge to do cheating. Once A Cheater, Forever A Cheater. Alex Carey should have walked off. Clear Cheating pic.twitter.com/2w8cjME4RS
— Aryan Goel (@Aryan42832Goel) December 17, 2025
या निर्णयामुळे इंग्लंडचा संघ कमालीचा वैतागला होता. सामन्यानंतर या वादात मोठी वळणे आली. स्निकोमीटर तंत्रज्ञान चालवणाऱ्या ‘बीबीजी स्पोर्ट्स’ (BBG Sports) या कंपनीने अधिकृतपणे आपली चूक मान्य केली. कंपनीने स्पष्ट केले की, ही ‘ऑपरेटर एरर’ (मानवी चूक) होती. ऑपरेटरने स्निकोसाठी चुकून दुसऱ्या स्टंप माईकचा ऑडिओ निवडला होता, ज्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क अचूकपणे टिपला गेला नाही.
“हो, मी आऊट होतो!” – कॅरीची कबुली
धक्कादायक बाब म्हणजे, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्वतः अॅलेक्स कॅरीने पत्रकार परिषदेत मान्य केले की, त्याच्या बॅटला चेंडू लागला होता आणि तो बाद होता. कॅरी म्हणाला, “हो, चेंडू बॅटला लागला होता, पण नशिबाने मला साथ दिली.” या जीवदानाचा फायदा घेत कॅरीने १०६ धावांची शानदार शतक खेळी साकारली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ८ बाद ३२६ धावांचा डोंगर उभारला.
तिसऱ्या पंचांच्या चुकीचा इंग्लंडला मोठा फटका –
अॅलेक्स कॅरी जर ७२ धावांवर बाद झाला असता, तर ऑस्ट्रेलियाला ३०० धावांचा टप्पा ओलांडणे कठीण झाले असते. या एका चुकीमुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडचा संघ या गंभीर तांत्रिक चुकीबाबत मॅच रेफरीकडे अधिकृत तक्रार करणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया आधीच २-० ने पुढे असल्याने, या वादग्रस्त निर्णयाचा परिणाम मालिकेच्या निकालावर होण्याची शक्यता आहे.





