Rajasthan Congress crisis : “गरज भासल्यास कठोर कारवाई करण्यास…” कॉंग्रेसची गेहलोत, पायलट यांना तंबी

नवी दिल्ली – आमच्यासाठी पक्ष संघटना सगळ्यांत महत्वाची असून गरज भासल्यास कठोर कारवाई करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही असा इशारा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांच्याच पक्षातील त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांना देण्यात आला आहे. इंदूर येथे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पोहोचली असून तेथे माध्यमांशी बोलताना पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी हा इशारा दिला आहे.
गेहलोत यांनी गेल्या आठवड्यात एका मुलाखतीत पायलट यांच्यावर अत्यंत विखारी टीका करत त्यांना गद्दार असे म्हटले होते. तसेच गद्दार व्यक्तीला पक्षश्रेष्ठी कधीच राजस्थानचा मुख्यमंत्री करणार नाहीत अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर गेहलोत गट आणि पायलट गट यांच्यात प्रचंड तणाव निर्माण झाला असून दोन्ही गटांची परस्परांवर चिखलफेक सुरू आहे. विशेष म्हणजे विधानसभेची निवडणूक एका वर्षावर आली असताना हा संघर्ष उफाळून आला असल्यामुळे पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांना सबुरीचा आणि शिस्त पाळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जयराम रमेश म्हणाले की, पक्षसंघटनेचे ज्यात हित असेल असाच तोडगा राजस्थानात आम्ही काढणार आहोत. त्यांच्यात सामंजस्य निर्माण करण्याची गरज असेल तर ते केले जाईल. अन्यथा कठोर निर्णय घेण्यासही पक्ष मागेपुढे पाहणार नाही. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात असून ती येत्या 4 डिसेंबरला राजस्थानात प्रवेश करणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसला त्यापूर्वी या विषयावर तोडगा काढावा लागणार आहे.
Hingoli : ऊसतोड कामगारांच्या मुलींची यशस्वी झेप; एक मुलगी ‘Engineer’ तर दोन मुली ‘MBBS’साठी पात्र
त्याचे कारण पायलट यांना जर मुख्यमंत्री केले नाही तर भारत जोडो यात्रा आम्ही रोखू असा इशारा राजस्थानातील गुर्जर समाजाने अगोदर दिला होता. अर्थात नंतर पायलट यांनी यात्रा निर्विघ्नपणे पार पडेल असे पायलट यांनी स्वत: म्हटले असले तरी गेहलोत पायलट संघर्षाचा फटका यात्रेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.





