israel-iran war : इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दिसून येत आहे. बलुचिस्तानचे अनेक भाग इराणी तेलावर अवलंबून असल्याने येथे इंधनाचा मोठा तुटवडा आहे. बलुचिस्तान हा इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेला प्रदेश आहे. येथील अनेक पेट्रोल पंप इराणमधून तस्करी करून आणलेल्या स्वस्त तेल आणि डिझेलवर अवलंबून होते. इराणमधून येणारा तेलाचा पुरवठा थांबताच, रविवारपासून पेट्रोल पंप बंद होऊ लागले आहेत. शेकडो लोक इंधनासाठी रांगेत उभे राहिले पण त्यांना निराश होऊन परतावे लागले. सीमा बंद, तेल आणि रेशन दोन्हीवर परिणाम : बलुचिस्तान प्रशासनाने सध्या सुरक्षेच्या कारणास्तव इराणशी असलेल्या सीमा बंद केल्या आहेत. पंजगुर आणि ग्वादर जिल्ह्यांची सीमा सील करण्यात आली आहे, ज्यामुळे केवळ तेलाचा पुरवठा थांबला नाही तर अन्नपदार्थांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. इराणी तेलाच्या व्यापारासाठी एक महत्त्वाचा मार्ग असलेला ग्वादरचा गब्द-कलातो सीमा बिंदू देखील अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. अनेक जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले : तुर्बत, ग्वादर, पंजगुर, चगाई, वाशुक आणि माशकेल यासारख्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. येथील ६० ते ७० टक्के पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत. या भागातील जीवनमान मोठ्या प्रमाणात इराणी तेल आणि अन्न पुरवठ्यावर अवलंबून आहेत. केंद्र सरकारने तेलाच्या किमतीतही वाढ केली : तेलाच्या संकटादरम्यान, पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ केली आहे. पेट्रोल ४.८० रुपये आणि डिझेल ७.९५ रुपये प्रति लिटर महाग झाले आहे. याचा सामान्य माणसाला दुप्पट फटका बसला आहे. घाबरण्याची गरज नाही… बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी परिस्थिती स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की क्वेट्टासारख्या मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल पंप खुले आहेत आणि इंधनाची कमतरता नाही. त्यांनी असा दावा केला की जे लोक पूर्वी तस्करीद्वारे इराणी तेल विकायचे ते आता अफवा पसरवत आहेत जेणेकरून बंदी उठवता येईल. रिंद यांनी म्हटले आहे की इराणी तेल विकणारे सुरक्षेसाठी धोका आहेत, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.