Alephata News: टाक्या उभ्या, पण पाणी कधी मिळणार? पिंपरी पेंढारमध्ये १० वर्षांपासून ग्रामस्थ पाण्याच्या प्रतीक्षेत
Alephata News: जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार (पोटे मळा) येथील पाणीपुरवठा योजना १० वर्षांनंतरही अपूर्ण; निकृष्ट दर्जामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप.

Alephata News – पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील पोटे मळा परिसरातील पाणीपुरवठा योजनेला तब्बल दहा वर्षांचा कालावधी उलटूनही ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा दावा करत प्रशासनाकडून चौकशी व कारवाईस होत असलेल्या कथित दिरंगाईच्या निषेधार्थ गणेश दत्तात्रय कुटे यांनी 25 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
कुटे यांनी यासंदर्भात गटविकास अधिकारी, पंचायत समिती जुन्नर तसेच उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही न केल्यास 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पाणीपुरवठा योजनेच्या टाकीजवळ आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
पोटे मळा येथील पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. योजनेच्या कामाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्याचा दावा कुटे यांनी केला आहे; मात्र चौकशी व कारवाई करण्याऐवजी संबंधित यंत्रणांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जुन्नर व ओतूर पोलीस ठाणे, ग्रामपंचायत पिंपरी पेंढार तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. उपोषणादरम्यान प्रकृतीस काही झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची राहील, असेही कुटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तांत्रिक तपासणीची मागणी
योजनेच्या कामाची वरिष्ठ अधिकार्यांमार्फत तांत्रिक तपासणी करण्यात यावी, निकृष्ट काम करणार्या कंत्राटदारावर तसेच त्यासाठी जबाबदार अधिकार्यांवर नियमानुसार कारवाई करावी आणि योजनेचे काम दर्जानुसार दुरुस्त करून ग्रामस्थांना सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणात सरकारी निधीचा गैरवापर झाल्याचा दावाही निवेदनातून करण्यात आला असून, निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे कुटे यांनी म्हटले आहे. 25 ऑगस्टपूर्वी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.






