Alephata Market: आळेफाटा उपबाजारात डाळिंबाचा धमाका! २० किलोच्या क्रेटला ६,५०० रुपयांचा विक्रमी दर
Alephata Market: दर्जेदार मालाला व्यापाऱ्यांची मोठी मागणी; पुणे, नाशिक, अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील डाळिंब उत्पादकांसाठी आळेफाटा उपबाजार बनला विश्वासार्ह केंद्र.

Alephata Market – जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात शुक्रवारी झालेल्या डाळिंब लिलावात 20 किलोच्या एका क्रेटला तब्बल 6 हजार 500 रुपयांचा या हंगामातील उच्चांकी दर मिळाला. दर्जेदार मालाला मिळालेल्या या विक्रमी भावामुळे डाळिंब उत्पादक शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी झालेल्या लिलावात सुमारे 3 हजार 500 क्रेट डाळिंबाची आवक झाली.
प्रथम दर्जाच्या डाळिंबाला प्रति क्रेट 6 हजार 500 रुपये, द्वितीय दर्जाला 5 हजार 500 रुपये, तृतीय दर्जाला 4 हजार 500 रुपये, चतुर्थ दर्जाला 3 हजार 500 रुपये, तर पाचव्या दर्जाच्या डाळिंबाला 2 हजार रुपये असा बाजारभाव मिळाला. उपबाजाराचे उपसभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे आणि कार्यालय व्यवस्थापक सतीष म्हस्करे यांनी सांगितले की, आळेफाटा उपबाजार हा डाळिंब विक्रीसाठी शेतकर्यांचा विश्वासार्ह बाजार म्हणून ओळख निर्माण करत असून दर्जेदार मालाला येथे सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या बाजारात पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर तसेच नाशिक, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर डाळिंब विक्रीसाठी येतात. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेली ही बाजारपेठ डाळिंब व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे.
यंदा दर्जेदार डाळिंबाची आवक वाढली असून व्यापार्यांकडूनही चांगली मागणी असल्याने शेतकर्यांना समाधानकारक दर मिळत असल्याचे डाळिंब आडतदार प्रवीण लेंडे, निशिकांत ढोमसे आणि विशाल कुटे यांनी सांगितले. विक्रमी बाजारभावामुळे डाळिंब उत्पादक शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी लिलावातही असेच समाधानकारक दर कायम राहावेत, अशी अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली.





