Alephata News: आळेफाटा बायपासवर कचर्याचे ढीग! रात्री मद्यपींचा वावर वाढल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Alephata News: खेड-सिन्नर महामार्गावरील आळेफाटा बायपास परिसरात कचऱ्याचे ढीग; दुर्गंधी आणि रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे नागरिक त्रस्त.

Alephata News – खेड-सिन्नर राष्ट्रीय महामार्गावरील आळेफाटा बायपास उड्डाणपुलालगतची मोकळी जागा सध्या कचर्याच्या विळख्यात सापडली आहे. प्लास्टिक, घरगुती कचरा आणि टाकाऊ वस्तूंचे मोठमोठे ढीग साचल्याने परिसराचे विद्रूपीकरण झाले असून दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच रात्रीच्या वेळी परिसरात मद्यपींचा वावर वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
या परिसराचे सुशोभीकरण करून हरित पट्टा विकसित करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य निशा नवनाथ वाळुंज यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक, वारजे कार्यालयाकडे अनेकदा लेखी तसेच तोंडी पाठपुरावा केला आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या जागेचा विकास करण्यासाठी ती उपलब्ध करून द्यावी किंवा महामार्ग प्राधिकरणाने स्वतः पुढाकार घेऊन परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. कचर्याच्या ढिगांमुळे परिसरातील पर्यावरणावरही विपरीत परिणाम होत आहे. या ठिकाणी हरित पट्टा विकसित करण्याच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या वृक्षांच्या संवर्धनालाही अडथळा निर्माण झाला आहे. पाण्याअभावी तसेच कचरा साचल्यामुळे अनेक झाडे मृत झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
त्यामुळे परिसराच्या सुशोभीकरणाच्या प्रयत्नांनाही खीळ बसली आहे. रात्रीच्या वेळी या भागात पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. अंधाराचा फायदा घेत मद्यपींच्या बैठका भरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे महिला, नागरिक तसेच या मार्गावरून ये-जा करणार्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आंदोलनाचा इशारा
या समस्येवर तातडीने कार्यवाही न झाल्यास लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे आळेफाटा बायपासवरील कचर्याच्या समस्येकडे महामार्ग प्राधिकरण आता गांभीर्याने कधी पाहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





