Albie JSK Coach : स्टीफन फ्लेमिंगची एक्झिट अन् एल्बी मॉर्केलची एंट्री! सुपर किंग्सने केली नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा
Albie JSK Coach : दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू एल्बी मॉर्केलला जोबर्ग सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे.

Albie Morkel Appointed Joburg Super Kings Head Coach SA20 : दक्षिण आफ्रिकेची प्रसिद्ध टी-२० लीग ‘SA20’ च्या आगामी पाचव्या हंगामापूर्वी जोबर्ग सुपर किंग्स (Joburg Super Kings) संघाने एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू एल्बी मॉर्केल (Albie Morkel) याला जोबर्ग सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी (Head Coach) नियुक्त करण्यात आले आहे. तो दिग्गज प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची जागा घेईल. फ्लेमिंग यांनी पहिल्या चार हंगामात संघाचे यशस्वी मार्गदर्शन केल्यानंतर पद सोडले असून, ते आता इंग्लंड कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत.
सुपर किंग्स फ्रँचायझीशी जुने नाते!
जोबर्ग सुपर किंग्स फ्रँचायझीने ३० जुलै रोजी अधिकृतपणे या नियुक्तीची घोषणा केली. एल्बी मॉर्केल पहिल्यांदाच मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र, सुपर किंग्स कुटुंबासोबत त्याचे नाते खूप जुने आहे. तो SA20 च्या पहिल्या हंगामापासूनच जोबर्गच्या कोचिंग स्टाफचा भाग होता. तसेच ‘आयपीएल’मध्ये (IPL) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) स्टार ऑलराउंडर म्हणून त्याने अनेक सामने जिंकवून दिले आहेत.
रूपा गुरुनाथ अन् विश्वनाथन यांनी व्यक्त केला विश्वास!
𝔸 𝕝𝕚𝕥𝕥𝕝𝕖 𝕐𝕖𝕝𝕝𝕠𝕧𝕖 𝕟𝕠𝕤𝕥𝕒𝕝𝕘𝕚𝕒 𝔽𝕋. 𝔸𝕝𝕓𝕚𝕖 💛✨#ThrowbackThursday #WhistlePodu pic.twitter.com/8WYP8XOsLN
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) July 30, 2026
सुपर किंग्सच्या मालकीण रूपा गुरुनाथ म्हणाल्या की, “एल्बी गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या सपोर्ट स्टाफचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्याने युवा खेळाडूंच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.” तर डायरेक्टर के.एस. विश्वनाथन यांनी सांगितले की, “एल्बीने खेळाडू आणि प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकांमध्ये सुपर किंग्सची संस्कृती जवळून अनुभवली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटची त्याला उत्तम समज आहे.”
स्टीफन फ्लेमिंगने निर्माण केलेला वारसा पुढे नेणे आणि SA20 च्या पाचव्या हंगामात जोबर्ग सुपर किंग्सला चॅम्पियन बनवणे, हे आता मॉर्केलसमोरील मुख्य आव्हान असेल.





