Alandi News : ‘रस्ता कुठे आणि खड्डे कुठे?’ लोणीकंद-आळंदी रस्त्याच्या दुर्दशेने वाहनचालक आणि वारकरी हैराण

प्रभात वृत्तसेवा
चिंबळी – कार्तिकी वारी अवघ्या आठ दिवसांवर आली असताना, आळंदीला जोडणाऱ्या लोणीकंद ते आळंदी या मुख्य रस्त्याची खड्ड्यांमुळे पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. सोळू ते धानोरे फाटा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांना ‘कोणता खड्डा चुकवू’ असा प्रश्न पडत आहे.आळंदीला जोडणारा हा मुख्य रस्ता असून, मरकळ, धानोरे आणि भोसरी भागातील औद्योगिक वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्यावर असते.
सार्वजनिक बांधकाम विभागाची निकृष्ट दर्जाची कामे आणि पावसाचे पाणी जाण्यासाठी दोन्ही बाजूला जागा नसणे, यामुळे रस्त्याची वाट लागली आहे. खास करून दुचाकी चालकांना खड्ड्यांचा मोठा उपद्रव होत आहे. मागील वर्षभरात या रस्त्याचे काम सुरू होते, मात्र डांबरीकरणाचा निकृष्ट दर्जा खड्ड्यांवरून स्पष्टपणे दिसून येतो. या भागात २०० ते २५० छोटे-मोठे कारखानदार असून, खड्ड्यांमुळे त्यांच्या उद्योगांवरही मोठा परिणाम होत आहे. यामुळे वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक हानी होत आहे.





