Alandi News : इंद्रायणी काठी भक्ती की ‘मद्यशक्ती’? ५० वर्षांपासून खुलेआम दारूविक्री; धक्कादायक वास्तव समोर
Alandi News : इंद्रायणी घाटावर वृद्ध महिलेमार्फत राजरोस गावठी दारूची विक्री; सात मावळे संघटनेने स्टिंग ऑपरेशन करत प्रशासनाचा बुरखा फाडला.

Alandi News – आळंदी नगरपरिषद हद्दीमधील इंद्रायणी तीरावर खुले आम महिलांमार्फत मद्यविक्री केली जात आहे. विशेष म्हणजे मद्यविक्री करणारी महिला, मी पन्नास वर्षांपासून दारू विकत असल्याचे सांगत आहे. धार्मिक स्थळांचे विडंबन सध्या अवैध धंदेवाल्यांकडून आळंदी शहरात राजरोस केले जात असल्याचे चित्र आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील सात मावळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका व्हिडिओद्वारे आळंदी शहरातील इंद्रायणी काठावर राजरोस मद्यविक्री कशी चालते हे उघड केले आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला इंद्रायणीकाठी कमानीमध्ये बसून गावठी दारू विकत असल्याचे दृश्य आहे.
30 ते 40 बाटल्या एका पिशवीमध्ये आणून ती मद्य विकत आहे, तर सभोवताली मद्यपान करणार्या तरुणांची रेलचेल दिसून येत आहे.
संबंधित महिलेला जाब विचारला असता, उलट उत्तर देते, गावात किती दारू विकतात, तिथे का नाही कोण बोलत? पोटासाठी दारू विकतो, आता काम होत नाही, काय करू? मी पन्नास वर्षे झाले दारू विकत आहे.
अशीच अवस्था दिवसभर इंद्रायणी तिरी दोन्ही दगडी तीरावर दररोज आढळून येते. मद्य विकणारे आणि मद्यपान करणारे यांचा तो अड्डाच झाला आहे. महिला मार्फत दारू विक्री करायची आणि पैसे कमवायचे हा काही लोकांचा धंदा झाला आहे. दिवसभर मद्यपान करून अस्ताव्यस्त मद्यपी पडलेले असतात. मद्यविक्रीमुळे इंद्रायणी घाटावर अस्वच्छता आणि घाणेरडे स्वरूप आले आहे.
विशेष म्हणजे आळंदी नगरपरिषद आणि आळंदी पोलीस ठाणे, दिघी पोलीस ठाणे यावर कोणतीही कारवाई ठोस रुपात करत नसल्याचे चित्र आहे.इंद्रायणी काठी भक्तीभावाने येणारे भाविकांना मात्र हे ओंगळवाणे चित्र नाईलाजाने पहावे लागते. पोलीस चिरीमिरी घेऊन पुन्हा संबंधित व्यक्तीला धंदा करण्यास भाग पाडतात.
पोलिसांनी मनात आणले तर सर्व काही होऊ शकते, मात्र त्यासाठी मानसिक इच्छा लागते. नगरपरिषद प्रशासनही आळंदीतील इंद्रायणी नदीकाठचे दोन्ही तीर स्वच्छ रहावेत यासाठी कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे. परिणामी आळंदीवर दिवस-रात्र मद्यविक्री आणि मद्यपींचा वावर असल्याचे चित्र आहे. आज सात मावळे संघटनेच्या वतीने मद्यविक्रीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला.
आळंदी सारख्या धार्मिक स्थळांची वाट तुम्ही लोकांनी लावलेली आहे. धार्मिक स्थळ हे स्वच्छ आणि पवित्र असले पाहिजे. यासाठी केवळ बघ्याची भूमिका न घेता सर्वसामान्य नागरिकांनी पुढे येऊन अशा वाईट गोष्टींचा समाचार घेतला पाहिजे. घाटावर चालणारा चंगळवाद प्रतिबंध केला पाहिजे.
– सात मावळे संघटना
पोलीस कारवाई व्हावी
आळंदी शहर पोलिसांनी मागील काही दिवसात मद्यपिणार्यांवर कारवाई केली. मात्र मद्य विकणार्यांवर कृपा असल्याचे चित्र आहे. आळंदी शहरात चावडी चौक पद्मावती रस्ता वडगाव रस्ता झोपडपट्टी चाकण चौक झोपडपट्टी अशा भागांमध्ये अवैधरित्या दारू विक्री करून काही गुन्हेगार आपले उपजीविका चालवीत आहे. अधून मधून लुटफुटीची कारवाई होते. मात्र सर्व दारू धंदे बंद पोलिसांकडून केले जात नसल्याचे चित्र आहे.





