Alandi Flood: आळंदीत नदीला भीषण महापूर! पुरात अडकलेल्या ४०८ भाविकांची सुखरूप सुटका
Alandi Flood: पूरग्रस्त भागातील गोशाळांमध्ये पाणी शिरल्याने जवानांची संवेदनशील कामगिरी; १५० गोवंशाचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर.

Alandi Flood – पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील इंद्रायणी नदीला भीषण महापूर आला आहे. या पूरपरिस्थितीत शहरातील विविध सखल भागांत आणि नदीकाठच्या आश्रयस्थानांमध्ये अडकून पडलेल्या तब्बल ४०८ भाविक व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे. आळंदी नगरपरिषद, पोलीस प्रशासन, स्थानिक अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एकत्र येत हे बचावकार्य युद्धपातळीवर राबवले.
इंद्रायणी नदीचे पाणी शहरात आणि मुख्य मंदिराच्या परिसरात शिरल्यामुळे प्रस्थान सोहळ्यासाठी आलेले अनेक भाविक अडकले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व यंत्रणांनी तातडीने समन्वय साधत मोहीम राबवली. बचाव पथकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरातून २२०, इंद्रायणी नगरी भागातून १००, ठाकूरबुवा मंडप येथून ६० आणि गोपाळपुरा परिसरातून २८ अशा एकूण ४०८ भाविकांची सुखरूप सुटका केली आहे. याशिवाय विविध ठिकाणी अडकलेल्या स्थानिक नागरिकांनाही शोधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
१५० मुक्या जनावरांचेही वाचवले प्राण
या बचावकार्यात केवळ मानवांचीच नव्हे, तर मुक्या जनावरांचीही विशेष काळजी घेण्यात आली. पूरग्रस्त भागातील गोशाळांमध्ये पाणी शिरल्याने जवानांनी अत्यंत कौशल्याने १५० गायींना पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढले. या सर्व गायींना तातडीने इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, प्रशासनाच्या या संवेदनशील भूमिकेचे वारकरी आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.
प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
सध्या आळंदीतील पूरग्रस्त भागात प्रशासनामार्फत मदत आणि आपत्कालीन सेवा अविरतपणे सुरू आहेत. वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सद्यस्थिती पाहता नागरिकांनी आणि भाविकांनी कोणत्याही सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच सर्वांनी प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.






