Alandi Cyber Crime: “गाडीवर दंड आहे का?” हे पाहणं पडलं महाग; आळंदीत ज्येष्ठ नागरिकाची २४ लाखांची फसवणूक
Alandi Cyber Crime: आळंदी पोलिसांची झारखंडमध्ये मोठी कारवाई; RTO चॅलणच्या नावाखाली ७० लाखांची एफडी मोडून २४ लाख लुटणाऱ्या दोघांना जामतारा येथून अटक.

Alandi Cyber Crime- आरटीओ चलानाच्या नावाने मोबाईलवर एपीके फाईल पाठवून त्याचा ताबा मिळवला आणि ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून 24 लाख 35 हजार 583 रुपये परस्पर वर्ग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सायबर फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह दोघांना आळंदी पोलिसांनी झारखंडमधील जामतारा परिसरातून अटक केली आहे. आळंदी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक फिर्यादी आहेत.
ते महिंद्रा पिकअप वाहनातून भाजीपाला वाहतुकीचे काम करतात. त्यांच्या व्हॉट्सप ग्रुपवर ‘आरटीओ चलान’ नावाची एपीके फाईल आली होती. आपल्या वाहनावर दंड आहे का, हे तपासण्यासाठी त्यांनी ही फाईल मोबाईलमध्ये स्थापित केली. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद पडला. मोबाईलमधील तांत्रिक बाबींची माहिती नसल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. दोन दिवसांनंतर त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून पैसे वजा झाल्याचे संदेश आले.
बँक स्टेटमेंट तपासले असता, खात्यातील 70 लाख रुपयांची मुदत ठेव मोडण्यात आल्याचे आणि त्यापैकी 24 लाख 35 हजार 583 रुपये विविध बँक खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पुढील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बँकेने संबंधित खाते तातडीने गोठवले. तपासादरम्यान पोलिसांनी विष्णुप्रसाद प्रसादी वर्मा (वय 25, रा. देवपूर, जि. गिरीडीह, झारखंड) आणि विनोद एतवारी मंडल (वय 42, रा. तिलकडीह, जि. गिरीडीह, झारखंड) यांना अटक केली.
पोलिसांच्या चौकशीत फसवणुकीची पद्धत समोर आली. विनोद मंडल हा क्रेडिट कार्डची देय रक्कम वेळेत भरता न येणार्या गरजू कार्डधारकांकडून कार्ड मिळवत असे. ‘तुमच्या क्रेडिट कार्डचे पैसे भरून देतो आणि मुदत वाढवून देतो,’ असे सांगून तो कार्ड घेत असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर ही कार्डे विष्णुप्रसाद वर्माकडे दिली जात होती. वर्मा एपीके फाईलच्या माध्यमातून मोबाईलचा ताबा मिळवून इतरांच्या खात्यांतून फसवणुकीद्वारे आलेली रक्कम या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून स्वीकारत असे.
फसवणुकीची रक्कम क्रेडिट कार्डवर जमा झाल्यानंतर ती विविध माध्यमांतून काढून घेतली जात होती. त्यामुळे संबंधित कार्डधारकाला काही काळ क्रेडिट कार्डच्या देयकासाठी मुदत मिळत असली, तरी फसवणुकीची रक्कम स्वीकारल्यामुळे त्याचे कार्ड ब्लॉक होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अनोळखी व्यक्तींना क्रेडिट कार्ड देऊ नका
क्रेडिट कार्डचे नूतनीकरण किंवा त्याची मुदत वाढवून देण्याच्या नावाखाली कोणत्याही अनोळखी व्यक्तीला क्रेडिट कार्ड देऊ नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि नोकरदारांना केले आहे. अशा कार्डचा वापर ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.






