Alandi Police : आरटीओ चलानच्या नावाने APK पाठवून 24 लाखांची फसवणूक; झारखंडमधून दोघांना अटक
Alandi Police : आरटीओ चलानच्या नावाने APK फाईल पाठवून 70 वर्षीय नागरिकाचा मोबाईल हॅक केला. 70 लाखांची FD मोडून 24.35 लाख रुपये वर्ग केल्याप्रकरणी आळंदी पोलिसांनी जामतारा परिसरातून दोघांना अटक केली.

Alandi Police : आरटीओ चलानच्या नावाने मोबाईलवर APK फाईल पाठवून मोबाईलचा ताबा मिळवला. त्यानंतर 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातील 70 लाख रुपयांची एफडी मोडून त्यातील 24 लाख 35 हजार 583 रुपये विविध बँक खात्यांमध्ये वर्ग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास करत आळंदी पोलिसांनी झारखंडमधील जामतारा परिसरातून मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 495/2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 316 (2), 318 (4), 3 (5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66 (सी), 66 (डी) अन्वये गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 70 वर्षीय नागरिक महिंद्रा पिकअप वाहन चालवतात. ते भाजी मार्केटमध्ये भाजीपाला वाहतुकीचे काम करतात. त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘आरटीओ चलान’ नावाची APK फाईल आली होती. आपल्या वाहनावर चलान आहे का, हे पाहण्यासाठी त्यांनी ही फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली.
फाईल इन्स्टॉल केल्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. मोबाईलमधील तांत्रिक बाबींची फारशी माहिती नसल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दोन दिवसांनी त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून पैसे वजा झाल्याचे संदेश आले. त्यांनी बँक स्टेटमेंट तपासले असता, बँकेत केलेली 70 लाख रुपयांची एफडी मोडण्यात आली असून त्यातील 24 लाख 35 हजार 583 रुपये विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचे दिसून आले. पुढील फसवणूक होऊ नये म्हणून बँकेने त्यांचे खाते तातडीने होल्ड केले.
या प्रकरणाच्या तपासात फिर्यादीचे बँक स्टेटमेंट आणि ऑनलाइन पोर्टलवरील तक्रारींचे विश्लेषण करण्यात आले. त्यातून हा गुन्हा विष्णुप्रसाद प्रसादी वर्मा (वय 25, रा. देवपूर, ता. अहिल्यापूर, जि. गिरीडीह, झारखंड) आणि विनोद एतवारी मंडल (वय 42, रा. तिलकडीह, ता. भेलवाघाटी, जि. गिरीडीह, झारखंड) यांनी केल्याचे समोर आले. दोघांना गिरीडीह येथील मुफसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली.
पोलिसांच्या चौकशीत फसवणुकीची पद्धत समोर आली. विनोद मंडल हा अशा क्रेडिट कार्डधारकांकडून कार्ड मिळवत असे, ज्यांना वेळेत क्रेडिट कार्डचे पेमेंट करता येत नसे. ‘तुमच्या कार्डचे पेमेंट करून देतो आणि मुदत वाढवून देतो’, असे सांगून तो त्यांच्याकडून कार्ड घेत असे.
त्यानंतर हे क्रेडिट कार्ड विष्णुप्रसाद वर्माला दिले जात असे. वर्मा APK फाईलच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यातून आलेली रक्कम स्वीकारण्यासाठी या कार्डचा वापर करत असे. कार्डमध्ये रक्कम भरल्यानंतर काही वेळातच ती रक्कम विविध माध्यमातून काढून घेतली जात असे. त्यामुळे संबंधित कार्डधारकाला काही दिवसांची मुदत मिळत असे; मात्र कार्डमध्ये फसवणुकीची रक्कम जमा झाल्याने ते कार्ड ब्लॉक होत असे.
या पद्धतीने काम करणाऱ्या आरोपींचा शोध घेत पोलिसांनी त्यांना जामतारा परिसरातून अटक केली. दोघांना जवळच्या न्यायालयात हजर करून ट्रांझिट रिमांड घेण्यात आला. त्यानंतर खेड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
आरोपींच्या झडतीमध्ये दोन मोबाईल, पाच क्रेडिट कार्ड, दोन क्रेडिट कार्डचे झेरॉक्स पेपर, एसबीआय बँक स्टेटमेंट आणि विविध बँक खात्यांचे पासवर्ड असलेले कागदपत्रे मिळाली आहेत. आरोपींकडून आणखी कोण सहभागी आहेत, तसेच विविध बँक खाती, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड कुठून मिळवले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग बसवराज तेली, पोलीस उपायुक्त मारुती जगताप आणि सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके, मपोहवा आरती निकम, पोलीस कर्मचारी सोळंके आणि जगताप यांनी केली. तांत्रिक मदतीसाठी सहायक पोलीस फौजदार राजू जाधव आणि मपोशि अरुणा खंदारे यांनी सहकार्य केले.
पोलिसांचे आवाहन : कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या नावावरील क्रेडिट कार्ड रिन्यू करण्यासाठी किंवा त्याची मुदत वाढवून देण्यासाठी देऊ नये. अशा प्रकारे वापरले जाणारे कार्ड ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी वापरले जाऊ शकते. तसेच APK फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड करू नये.





