Alandi Crime : पखवाज थांबव, नाहीतर…! आळंदीमध्ये वारकरी विद्यार्थ्याला बेदम मारहाण

प्रभात वृत्तसेवा
आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सिद्धबेट परिसरात आज पहाटे पखवाज सराव करणाऱ्या एका वारकरी विद्यार्थ्याला व्यसनाधीन तरुणांकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पखवाज वाजू नको, असे सांगून मारहाण केल्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थ्याने एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत आश्रय घेतला, मात्र आरोपींनी तेथेही घुसून त्याला मारहाण केली.पहाटेच्या सुमारास मारहाण झालेला विद्यार्थी आणि इतर दोन वारकरी संप्रदायातील विद्यार्थी पखवाज नित्यनियमाने सरावासाठी सिद्धबेट येथे गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या तीन व्यसनाधीन तरुणांनी त्यांना पखवाज वाजू नको म्हणून दम दिला.
विद्यार्थ्यांनी सराव थांबवला, पण थोड्या वेळाने पुन्हा सुरू केला. यामुळे संतापलेल्या तरुणांनी परत येऊन त्यांना दमदाटी केली.विद्यार्थी मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी आवराआवर करून निघत असताना, त्यापैकी एका तरुणाने विद्यार्थ्याला चापट मारली. विद्यार्थ्याने दुर्लक्ष करून निघण्याचा प्रयत्न केला असता, त्या तरुणाने पुन्हा त्याला मारहाण केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सदर विद्यार्थ्याने शेजारी असलेल्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आश्रय घेतला. परंतु, व्यसनाधीन तरुण त्या ठिकाणी धावत गेले आणि दरवाज्यावर जोरजोरात थापा मारू लागले.
आतील विद्यार्थ्यांनी दरवाजा उघडला असता, त्या तरुणांनी हातातील दांडक्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झाली आहे.या घटनेनंतर घाबरलेल्या विद्यार्थ्याला घेऊन आळंदी शहर शिवसेनाप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण, उपशहर प्रमुख नितीन ननवरे, सचिन मोहन शिंदे, गजानन महाराज कदम व त्यांचे सहकारी, तसेच वारकरी क्षेत्रातील मंडळींनी आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
शिवसेनाप्रमुख राहुल चव्हाण यांनी घडलेला प्रकार अधिकाऱ्यांच्या कानावर घातला. यातील दोन आरोपी पोलिसांना सापडले असून, एक आरोपी फरार असल्याचे समजते. दरम्यान, तपास करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशीही या व्यसनाधीन तरुणांनी अरेरावीची भाषा करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. माऊलींच्या आळंदीमध्ये नित्यनियमाने सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेली मारहाण ही अतिशय खेदाची बाब असून, याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी होत आहे.





