Amritanubhav Pat Sanstha Scam – आळंदी येथील अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्थेतील तब्बल 11 कोटी 3 लाख 13 हजार 380 रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणामुळे ठेवीदारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात तत्कालीन व्यवस्थापक बाळू अर्जुन पवार, ऑडिटर संजय लांडगे आणि सोनार पूर्णानंद खोल्लम यांच्याविरोधात 23 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे कर्जदार तयार करून सोने तारण कर्ज मंजूर केल्याचे दाखवले. प्रत्यक्षात कोणतेही सोने गहाण नसताना कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. या कटात ऑडिटर आणि सोनार यांनी खोटे अहवाल देत संचालक मंडळाची दिशाभूल केल्याचेही निष्पन्न झाले आहे. संचालक मंडळाचे अध्यक्ष संजय जयसिंग शिर्के यांच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, दोन महिने उलटूनही कारवाईला गती न आल्याने ठेवीदार संतप्त झाले आहेत. गुरुवारी (दि. 9) 100 हून अधिक नागरिकांनी एकत्र येत आळंदी पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिले. अनेक ठेवीदारांनी बचत खाते व ठेव योजनांमध्ये मोठी गुंतवणूक केली असून पैसे काढण्यासाठी संपर्क साधला असता टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या पतसंस्थेच्या कार्यालयाला कुलूप असून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याची तक्रार ठेवीदारांनी केली आहे. काही ठेवीदारांना धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. संचालक मंडळाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून त्यांच्या परवानगीशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार होत नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामुळे संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करून अडकलेली रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी ठेवीदारांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. ठेवीदारांना लवकर न्याय न मिळाल्यास मोठ्या स्वरूपात मोर्चा व आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.