अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट; पाच पोलिसांवर गुन्हा दाखल होणार ?

Akshay Shinde Encounter Case Update : बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना 23 सप्टेंबर 2024 रोजी त्याचा एन्काऊंटर करण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यभरात गदारोळ उठला, अनेकांनी या एन्काऊंटरचं स्वागत केले तर विरोधकांनी एन्काऊंटर नसून ही हत्या असल्याचे म्हटले होते.
आरोपीला शिक्षा देण्याचे काम न्यायालयाचे आहे, पण पोलिसांनी कायदा हाती घेतल्याची प्रतिक्रिया देखील त्यावेळी विरोधकांनी दिली होती. आता, याप्रकरणी न्यायालयीन समितीचा अहवाल समोर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात हा अहवाल वाचून दाखवण्यात आला. त्यामध्ये, अक्षय शिंदेला बनावट चकमकीत ठार करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, या बनावट चकमकीतील 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला. त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार पोलीस कर्मचारी परिस्थिती सहज हाताळू शकले असते आणि बळाचा वापर न्याय्य ठरू शकत नाही. त्यामुळे राज्याने या पोलिसांवर एफआयआर नोंदवणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने आज (20 जानेवारी) खुल्या न्यायालयात या अहवालाचे वाचन केले. “संकलित केलेले साहित्य आणि एफएसएल अहवालानुसार मृताच्या पालकांचे आरोप योग्य आहेत आणि हे पाच पोलीस त्याच्या मृत्यूला जबाबदार आहेत, असे खंडपीठाने म्हटले. अहवालानुसार, बंदुकीवर मृत व्यक्तीच्या बोटांचे ठसे नाहीत. त्याने स्व-बचावासाठी गोळीबार केल्याची पोलिसांची भूमिका अन्यायकारक आणि संशयाच्या छायेत असल्याचे नमूद केले आहे.
पाच पोलिसांवर गुन्हा दाखल होणार –
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांच्या सहाय्याने खंडपीठाला माहिती दिली की राज्य कायद्यानुसार कारवाई करेल आणि गुन्हा दाखल केला जाईल. त्याचवेळी, कोणत्या तपास यंत्रणेद्वारे प्रकरणाची चौकशी करणार? अशी विचारणा न्यायालयाने सरकारी वकील हितेन वेणेगावकार यांच्याकडे केली व त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रत महानिबंधक कार्यालयाने सरकारी वकील आणि शिंदे याच्या कुटुंबीयांच्या वकिलांना उपलब्ध करून देण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले.
शिंदे याच्याशी झालेली चकमक बनावट असल्याचा दावा करून त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी, कायद्यानुसार या चकमकीची न्यायदंडाधिकाऱ्यांतर्फे चौकशी सुरू करण्यात येत असल्याचे सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले होते. न्यायालयाच्या देखरेखीखाली प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यावेळीही न्यायालयाने राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) या चकमक प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच, तपासातील त्रुटींवर बोट ठेवताना प्रकरणातील तपास यंत्रणेचे वर्तन हे संशय निर्माण करणारे असल्याचे ताशेरेही ओढले होते.
तपासाशी संबंधित नेमकीच कागदपत्रे प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांना उपलब्ध केली जात आहेत. सीआयडीच्या या वर्तनातून तपास यंत्रणेला हेतुत: न्यायदंडाधिकाऱ्यांना माहिती द्यायची नसल्याचा चुकीचा आणि प्रतिकूल निष्कर्ष निघत असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली होती. आरोपीच्या गोळीबारात जखमी झालेल्या पोलिसाची वैद्यकीय कागदपत्रे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादरच करण्यात आली नसल्याची बाब उघडकीस आल्यानंतर खंडपीठाने सीआयडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले होते व तपास यंत्रणेने तपासात त्रुटी ठेवून स्वत:च तपासाबाबत संशय निर्माण केल्याचे न्यायालयाने ताशेरे ओढले होते.
माझा मुलगा निर्दोष होता; अक्षयच्या आईची प्रतिक्रिया –
या अहवालानंतर अक्षयच्या आईने प्रतिक्रिया देताना माझा मुलगा निर्दोष असल्याचे म्हटले. माझा मुलगा निर्दोष होता त्याने गुन्हा केलाच नव्हता. ज्यांनी गुन्हे केलेले आहेत, कोर्टाने आदेश दिल्यानुसार त्यांना सजा भेटेल हेच माझे म्हणणे आहे. माझ्या मुलाने गुन्हा केलाच नव्हता, माझा मुलगा सत्य होता आणि हे सत्यच आहे. मी त्याची आई आहे, मला त्याच्यावर विश्वास आहे. माझ्या मुलावर बलात्काराचा आरोप टाकला होता, आणि त्यानंतर त्याचा एन्काऊंटर केला, त्या लोकांनी त्याला मारून टाकले, अशी भावनिक प्रतिक्रिया अक्षय शिंदेंच्या आईने दिली.
न्यायालयातील अहवालात निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे, माझ्या मुलाने गुन्हा केलाच नव्हता, कोर्टाने त्या लोकांना सजा दिली आहे. माझा मुलगा सत्य होता, तर ते सत्यच झालं आहे. आम्हाला कुठेही मिळत काम नाही, आम्ही कल्याणमध्ये आहोत. अजूनही कल्याणमध्ये भीक मागून खात आहोत. कोर्टाने दिलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत असल्याचे अक्षय शिंदेच्या आईने माध्यमांशी बोलताना म्हटले.




