Akshay Shinde Encounter : अखेर कडक पोलीस बंदोबस्तात अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार

Akshay Shinde Encounter – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह पुरण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. मात्र अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी जमीन देण्यास प्रत्येक ठिकाणी स्थानिकांकडून विरोध होताना दिसला.
मात्र, न्यायालयाने दिलेल्या आदेशाला एक दिवस बाकी असताना अक्षय शिंदेवर उल्हासनगरमधील स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशानंतर गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांकडून अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. त्यातच न्यायालयाने दिलेली मुदत उद्या, म्हणजेच सोमवारी (29 सप्टेंबर) संपत असल्याने पोलिसांनी उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्माशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्याचे ठरवले. त्यानुसार आज पहाटे खड्डाही खोदला. पण स्थानिकांसह शिंदे गटाला याबाबतची माहिती मिळाली.
आज दुपारच्या सुमारास या सर्वांनी स्मशानभूमीत उपस्थित खड्डा बुजवला आणि जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड करत स्थानिकांना स्मशानभूमीच्या बाहेर काढले आणि जागा मोकळी केली.
त्यानंतर जेसीबीने पुन्हा खड्डा खोदला, तर दुसरीकडे कळवा रुग्णालयातील शवगृहातून आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहितेतून उल्हासनगच्या दिशेने रवाना करण्यात आला. यानंतर पोलीस बंदोबस्तात अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.





