Akshay Shinde Encounter : ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा; सुप्रीम कोर्टात जनहित याचिका

Akshay Shinde Encounter – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवर मुंबई उच्च न्यायालयाने अनेक प्रश्न उपिस्थत केले असताना आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेत एन्काऊंटर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे.
या एसआयटीकडून एन्काऊंटर प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यापूर्वी एन्काऊंटरवर मुंबई उच्च न्यायालयानेही उपस्थित सवाल उपस्थित केले होते.
दरम्यान, अक्षय शिंदे याचा ठाणे पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. तळोजा कारागृहातून ठाण्याला नेताना मुंब्रा बायपास जवळ त्याचा एन्काऊंटर झाला. अक्षय शिंदेला तुरुंगातून ताब्यात घेऊन जात असताना त्याने शेजारी बसलेल्या पोलिसाची बंदूक खेचली.
त्यानंतर त्याने गोळीबार केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले. यानंतर पोलिसांनी स्वत:च्या संरक्षणासाठी गोळीबार केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी केलेल्या गोळाबारात अक्षयचा मृत्यू झाला.





