Akshay Shinde Encounter : ‘त्यावेळी अक्षयने….’; असा झाला अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर, स्वतः पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

Akshay Shinde Encounter | Badlapur School Case : बदलापुरातील नामांकित शाळेत काम करणाऱ्या अक्षय शिंदे याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. सोमवारी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.
झालं असं की, आरोपी अक्षय शिंदे हा तळोजा तुरुंगात होता. सोमवारी (२३ सप्टेंबर) सायंकाळी ५.३० वाजता तळोजा तुरूंगातून त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी पोलीस घेऊन जात होते. बदलापूर पोलिसांचे पथक तळोजा तुरुंगात गेल्यानंतर अक्षय शिंदेला ताब्यात घेतले. त्यानंतर ते तळोजा तुरुंगातून बाहेर पडले.
त्यानंतर मुंब्रा बाह्यवळण मार्गावर व्हॅन आल्यानंतर अक्षयने पोलिस पथकातील सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांच्याकडील पिस्तूल हिसकावले आणि पोलिसांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या.
यापैकी एक गोळी मोरेंच्या डाव्या पायाच्या मांडीला लागली. त्यावेळी पोलिस पथकातील एका अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ अक्षयच्या दिशेने एक गोळी झाडली आणि यात त्याचा मृत्यू झाला.
मात्र, घटनेनंतर राज्यात एकच खळबळ निर्माण झाली असून, सर्व स्तरातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. राजकीय नेते देखील एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दिसून येत आहेत. विरोधकांनाही तर सत्ताधारी पक्षाला चांगलंच धारेवर धरलं आहे.
दरम्यान, कालपासून सुरु असलेल्या या प्रकरणावर आता ठाणे पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी याप्रकरणातील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला. तसेच सध्या या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून केला जात आहे, असेही पोलिसांनी सांगितले
ते म्हणाले की, “काल जी घटना घडली आहे, त्याबद्दल एक अपडेट देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. काल बदलापुरातील बाल लैंगिक अत्याचारातील अटक आरोपी अक्षय शिंदे याच्याविरुद्ध बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला होता.
अक्षय शिंदेंच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते, या तपास पथकातील अधिकारी काल न्यायालयाचे ट्रान्सफर वॉरंट घेऊन कायदेशीररित्या आरोपीचा ताबा घेण्यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात गेले होते.
तिथून त्याला घेऊन येत असताना या आरोपीने पोलिसांचे पिस्तुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना जी घटना घडली, त्याबद्दल मुंब्रा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार २६२, १३२, १०९, १२१ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात आरोपीच्या मृत्यूनंतर अकस्मात मृत्यू प्रकरण दाखल करण्यात आलं आहे. या दोन्हीही प्रकरणाचा तपास ठाणे पोलीस आयुक्त करत आहेत, असेही ठाणे पोलीस यावेळी म्हणाले.





