Coastal Police : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; 250 हून अधिक अग्निवीरांना महाराष्ट्राच्या कोस्टल पोलिस दलात थेट नियुक्ती
Coastal Police : नौदलातील कार्यकाळ पूर्ण केलेल्या 250 हून अधिक अग्निवीरांना महाराष्ट्राच्या कोस्टल पोलिस दलात सामावून घेण्यात आले आहे. सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

Coastal Police : नौदलातील कार्यकाळ पूर्ण करून परतलेल्या 250 हून अधिक अग्निवीरांना महाराष्ट्र पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलात (कोस्टल पोलिस) सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
नौदलात अग्निवीरांना कठोर प्रशिक्षण मिळते. तसेच त्यांना सीमेवर काम करण्याचा अनुभवही मिळतो. त्यामुळे प्रशिक्षित आणि अनुभवी जवानांचा पोलिस दलाला फायदा होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी कोस्टल पोलिस दल मजबूत करण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतलेले मनुष्यबळ उपलब्ध होण्यास वेळ लागणार होता. आता नौदलातील अग्निवीरांच्या समावेशामुळे हे मनुष्यबळ मिळाले आहे.
या भरतीसाठी नियमांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. ही थेट भरती प्रक्रिया असून अग्निवीरांना स्वतंत्र चाचणीतून सूट देण्यात आली आहे. नौदलात यापूर्वीच कठीण निवड प्रक्रिया आणि प्रशिक्षण पूर्ण केल्याने त्यांना थेट नियुक्ती आदेश देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.





