प्रभात वृत्तसेवा पुणे – लहान मुले हल्ली मोबाइल गेममध्ये रमली आहेत. त्यामुळे मैदानात येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत पुण्यातून तब्बल ४४ हजार खेळाडू मैदानात उतरत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. खेळातूनच आरोग्य घडते आणि आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन अभिनेता अक्षय कुमारने केले. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी क्रीडेला दिलेल्या चालनेबद्दल त्यांनी अभिनंदनही केले. खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप गुरुवारी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाला. मोहोळ यांनी भारतमातेची प्रतिमा देऊन अक्षय कुमारचा सत्कार केला. महोत्सवातील विजेत्या चार हजार खेळाडूंचा या प्रसंगी गौरव करण्यात आला. अक्षय कुमार यांनी लहान खेळाडूंशी संवाद साधला. अक्षय कुमार आणि मोहोळ सायकल चालवत व्यासपीठाजवळ आले, यावेळी वातावरणात चांगलाच जल्लोष रंगला होता. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, खेलरत्न पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, मुख्य समन्वयक मनोज एरंडे, ऑलिम्पियन रेखा भिडे, माजी कबड्डीपटू शांताराम जाधव, ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे, तेनसिंग नोर्गे पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर, ध्यानचंद पुरस्कारप्राप्त टेनिसपटू नितीन कीर्तने, माजी क्रिकेटपटू केदार जाधव, सुरेखा द्रविड, श्रीरंग इनामदार तसेच प्रकाश जावडेकर, धीरज घाटे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, राजेश पांडे, सचिन भोसले उपस्थित होते.मुरलीधर मोहोळ म्हणाले, विकसित भारत बलवान असला पाहिजे. फिट इंडिया आणि क्रीडा महोत्सवांचे उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून ३७ क्रीडा प्रकारांत २९ ठिकाणी स्पर्धा घेतल्या. पुण्याची क्रीडा परंपरा वैभवशाली आहे; ती अधिक समृद्ध करणे हा मुख्य उद्देश आहे. तर यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील डॉ. प्रवीण दबडघाव, अंजली भागवत यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले.