Maharashtra Kesari 2026 : वाघोलीत शड्डू घुमला! ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार सुरू; सुनेत्रा पवारांच्या हस्ते जंगी उद्घाटन
Maharashtra Kesari 2026 : १८ ते २२ मार्च दरम्यान वाघोलीच्या बाजारतळ मैदानावर कुस्तीचा रणसंग्राम; भव्य दिव्य आखाडा आणि प्रेक्षक गॅलरीने वेधले सर्वांचे लक्ष.

Maharashtra Kesari 2026 – वाघोली येथे होणार्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य दिव्य उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व परिसरातील महीला लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत वाघोली बाजारतळ मैदान येथे झाले. स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी मध्ये उद्घाटनाच्या दिवशी तुडुंब गर्दी कुस्तीशौकिनांनी केली होती.
यंदाची 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाघोली येथे 18 ते 22 मार्च दरम्यान होत असून बाजारतळ मैदान येथे भव्य दिव्य आखाडा, प्रेक्षक गलरी, पैलवानांची व्यवस्था, मान्यवरांसाठी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये विजेत्या मल्लांना लाखो रुपयांची बक्षिसे असल्याने कुस्तीपातुंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
18 मार्च रोजी या स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महापौर मंजुषा नागपुरे तसेच लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित महिलांच्या उपस्थितीत सायंकाळी करण्यात आले. उद्घाटनावेळी पहिल्या दिवशी फोक प्रबोधन हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. पहिल्या दिवशीच्या माती व मॅट वरील विविध गटातील कुस्त्या घेण्यात आल्या.
महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्रातील 42 जिल्हा संघाचे कुस्तीपटू, प्रशिक्षक वाघोलीत दाखल झाले असून त्यांच्या निवासाची सोय बीजेएस वसतिगृहात करण्यात आली आहे. कुस्तीशौकिनांच्या व पैलवानांच्या गर्दीने वाघोलीची क्रीडानगरी गजबजली आहे.





