Maharashtra Kesari 2026 : वाघोलीत शड्डू घुमणार! ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा रणसंग्राम बाजारतळ मैदानावर
Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि रामकृष्ण कर्तव्य फाऊंडेशनचा मोठा पुढाकार; वाघोली ग्रामस्थांच्या आग्रहास्तव ठिकाणात बदल.

Maharashtra Kesari 2026 – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने व रामकृष्ण कर्तव्य फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित ६८ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा वाघोली येथे होणार असून वाघोलीतील ग्रामस्थांच्या आग्रहास्तव ही स्पर्धा ही मुख्य गावात वाघोली बाजारतळ मैदान येथे पार पडणार आहे. आयोजनाची पूर्व तयारीची वाघोली ग्रामस्थांची बैठक शुक्रवारी (दि.२०) पार पडली असून स्पर्धा भव्य आणि यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
बैठकीत स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना, जबाबदाऱ्यांचे वाटप, नियोजनाची रूपरेषा तसेच आवश्यक सुविधा व व्यवस्थापन याबाबत चर्चा करण्यात आली. बाजारतळ मैदान येथे उभारण्यात येणाऱ्या मैदान आराखडा, पार्किंग व इतर आवश्यक सोयी- सुविधांच्या नियोजनाचे प्राथमिक सादरीकरण करण्यात आले. यावेळी अनेकांनी आपला अभिप्राय व सूचना मांडल्या.
ही स्पर्धा वाघोलीकरांसाठी ऐतिहासिक क्षण असून, वाघोलीच्या नावलौकिकात भर पडावी यासाठी आम्ही सर्व वाघोलीकर जोमाने ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडू, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीस वाघोली परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाहनांच्या पार्किंगचे विशेष नियोजन
वाघोली येथील बाजारतळ मैदानात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत असल्याने वाहतूक कोंडी लक्षात घेता तसेच महाराष्ट्र भरातून येणाऱ्या कुस्ती शौकिनांच्या वाहनांच्या पार्किंग साठी जागांचे विशेष नियोजन आयोजकांकडून केले जात आहे. महामार्गालगत असणाऱ्या शाळा, शासकीय मोकळ्या जागा, ग्रामस्थांच्या मोकळा खासगी जागांवर पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे.





