Akluj News: अकलूजमध्ये ‘एसीबी’चा मोठा ट्रॅप! डीवायएसपींच्या नावाने २५ लाखांची लाच; दोघांना पकडले रंगेहाथ
Akluj News: अकलूज पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात मदत करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने मागीतली लाच; पुणे 'एसीबी'ने सापळा रचून केली कारवाई.

Akluj News – अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी, कठोर कलमे न लावण्यासाठी आणि अटकपूर्व जामिनात मदत करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या (डीवायएसपी) नावाने तब्बल २५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दोन पोलीस हवालदारांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत साडेपाच लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना दोन खाजगी दलालांना रंगेहाथ पकडून अटक केली. अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील हवालदार अनिल महादेव शिंदे, माळशिरस पोलीस ठाण्यातील हवालदार राहुल मारुती वाघ तसेच खाजगी दलाल आबा वळकुंदे (वय ४८, रा. वळकुंदे मळा, ता. माळशिरस) आणि महादेव माने (वय ३९, रा. मोटेवाडी, ता. माळशिरस) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
यापैकी आबा वळकुंदे व महादेव माने या दोघा दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराच्या भावावर आणि इतरांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी हवालदार अनिल शिंदे याने २५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शिंदे याने खाजगी इसम आबा वळकुंदे याच्या मोबाईलवरून तक्रारदाराशी संपर्क साधला.
गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी आणि पीसीपीएनडीटीचे कलम न लावण्यासाठी अकलूजचे तपास अधिकारी (डीवायएसपी) संतोष वाळके यांच्या नावाने २५ लाख व काम झाल्यावर स्वतःसाठी ५ लाख रुपये मागितले होते. त्यापैकी १० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारला होता. याबाबत तक्रारदाराने एसीबी पुणे येथे तक्रार दाखल केली होती. पडताळणी दरम्यान लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर, शुक्रवारी (दि. २८)
माळशिरस येथील पालखी महामार्गावरील पिलीव रस्त्यावरील पुलाजवळ तक्रारदाराकडून ५ लाख ५० हजार रुपये स्वीकारताना दोन्ही दलालांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एसीबीचे पोलीस अधिक्षक सतीश वाळके पुढील तपास करीत आहेत. या कारवाईस पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.





