ACB Pune Raid : महावितरण कार्यालयात एसीबीचा छापा! अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक
ACB Pune Raid : महावितरणच्या हडपसर उपविभाग-२ मधील अतिरिक्त कार्यकारी अभियंता लाचलुचपत विभागाच्या ताब्यात; भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई.

ACB Pune Raid – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे पथकाने महावितरणच्या हडपसर उपविभाग-२ मधील अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र नारायण लोंढे ( ४२) यांना ७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारी हडपसर येथील महावितरण कार्यालयात करण्यात आली. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे इलेक्ट्रिकल सब-कॉन्ट्रॅक्टर असून महावितरणची विविध कामे करतात.
त्यांनी नव्याने बसविलेल्या १२ वीजमीटर जोडणीच्या कामासाठी प्रतिमीटर एक हजार रुपये या प्रमाणे १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी लोंढे यांनी केल्याची तक्रार २ जून रोजी एसीबीकडे केली होती. तसेच अन्य एका इमारतीच्या वीजजोडणीच्या कामासाठी तब्बल ५० हजार रुपयांची मागणी केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला होते.
तक्रारीची पडताळणी करताना लोंढे यांनी १२ हजार रुपयांच्या लाचेपैकी ४ हजार ५०० रुपये यापूर्वी घेतल्याचे मान्य केले. उर्वरित ७ हजार ५०० रुपयांची मागणी केल्याचेही एसीबीच्या पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने गुरुवारी सापळा रचला. हडपसर उपविभाग-२ कार्यालयात तक्रारदाराकडून ७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना लोंढे यांना दुपारी १ वाजता रंगेहात पकडण्यात आले.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे यांनी केले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करीत आहेत. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.





