Ajit Pawar Birthday: अजितदादा माझे सर्वस्व… माझी प्रेरणा! सुनेत्रा अजित पवार
Ajit Pawar Birthday अजितदादा घरात जितके प्रेमळ होते, तितकेच बाहेर लोकांसाठी झटणारे होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक माणसाला त्यांनी आपले मानले. शेतकरी असो, कामगार असो, महिला असोत, युवक असोत किंवा सामान्य नागरिक प्रत्येकाच्या वेदना त्यांनी स्वतःच्या समजून घेतल्या.

Ajit Pawar Birthday: जीवनात काही नाती शब्दांत मांडता येत नाहीत. ती फक्त जगावी लागतात, अनुभवावी लागतात. अजितदादा माझ्यासाठी केवळ पती नव्हते; ते माझे मित्र, मार्गदर्शक, आधारवड आणि प्रत्येक संकटात खंबीरपणे हात धरून उभे राहणारे माझे सर्वस्व होते.
आज ते आपल्यात नाहीत, हे सत्य स्वीकारताना मन अजूनही असंख्य प्रश्न विचारते. सकाळी उठल्यावर त्यांचा आवाज ऐकू येणार नाही, दिवसाच्या शेवटी आज काय झालं? असा साधा प्रश्न विचारणारा सहकारी सोबत नसेल, ही जाणीव प्रत्येक क्षणी असह्य वेदना देत राहते. घरातील प्रत्येक कोपरा, प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक आठवण त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देत राहते.
आमच्या मुलासाठी तर ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. वडिलांच्या मायेचे छत्र हरवणे म्हणजे आयुष्यभराची उणीव. मुलाच्या डोक्यावरचा आधार गेला, आणि माझे सर्वस्वच निघून गेले. पण त्याचवेळी आई म्हणून आणि दादांची जीवनसाथी म्हणून मला स्वतःला सावरावे लागले. कारण दादांनी आम्हाला कधीही संकटापुढे हार मानायला शिकवले नाही.
अजितदादा घरात जितके प्रेमळ होते, तितकेच बाहेर लोकांसाठी झटणारे होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक माणसाला त्यांनी आपले मानले. शेतकरी असो, कामगार असो, महिला असोत, युवक असोत किंवा सामान्य नागरिक प्रत्येकाच्या वेदना त्यांनी स्वतःच्या समजून घेतल्या. म्हणूनच आज ते शरीराने आपल्यात नसले, तरी महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या मनात ते आजही जिवंत आहेत.

Ajit Pawar and Sunetra Pawar
दादांनी आयुष्यभर पदासाठी राजकारण केले नाही, त्यांनी लोकांसाठी राजकारण केले. त्यांनी कमावलेली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतील जीवाभावाची माणसं आज मी जेव्हा राज्यभर फिरते, तेव्हा प्रत्येक ठिकाणी लोकांच्या डोळ्यांत दादांविषयीचे प्रेम, आदर आणि आपुलकी दिसते. अनेक जण भेटून म्हणतात, ताई दादा नाहीत, पण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हे शब्द मला नव्याने जगण्याची ताकद देतात.
दादांच्या जाण्यानंतर माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे. ही जबाबदारी कोणत्याही पदाची नाही; ती त्यांच्या विश्वासाची, त्यांच्या विचारांची आणि त्यांनी जपलेल्या माणुसकीची आहे. प्रत्येक निर्णय घेताना एकच विचार मनात येतो—दादा असते तर त्यांनी काय केले असते? आणि त्याच उत्तरातून मला पुढे जाण्याचा मार्ग मिळतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दादांसाठी केवळ राजकीय पक्ष नव्हता; तो एक परिवार होता. त्या परिवारातील प्रत्येक कार्यकर्त्यावर त्यांचे निस्सीम प्रेम होते. आज त्या प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रेम आणि विश्वास माझ्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे ही वाट कितीही कठीण असली, तरी दादांची प्रेरणा आणि कार्यकर्त्यांचे बळ मला कधीच एकटे पडू देणार नाही.
दादांनी मला नेहमी सांगितले होते, लोकांशी जोडलेले राहा, त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि शक्य तेवढे त्यांच्यासाठी काम करा. आज त्याच शब्दांना मी माझे ध्येय मानले आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, त्यांनी जपलेल्या मूल्यांना पुढे नेण्यासाठी आणि त्यांनी उभारलेल्या विश्वासाला कायम ठेवण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहीन.
आज माझ्या आयुष्यात त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पती म्हणून, मित्र म्हणून आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा साथीदार म्हणून त्यांनी दिलेल्या आठवणीच आता माझी सर्वात मोठी ताकद आहेत. त्या आठवणींमध्ये अश्रू आहेत, वेदना आहेत; पण त्याचबरोबर प्रेरणा, धैर्य आणि कर्तव्याची जाणीवही आहे.
दादा, तुम्ही आज आपल्यात नाही. पण तुमचा विचार, तुमचे संस्कार, तुमची कार्यनिष्ठा आणि महाराष्ट्रावरचे तुमचे प्रेम आमच्या प्रत्येक पावलात कायम जिवंत राहील. तुमच्या नावाने, तुमच्या प्रेरणेने आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही लोकसेवेचा हा प्रवास पुढे नेत राहू. तुमची आठवण ही केवळ दुःख नाही ती आमच्यासाठी आयुष्यभर प्रेरणा देणारी शक्ती आहे.





