अजितदादा : शब्दाला जागणारा, कामासाठी झटणारा आणि माणसं जोडणारा नेता
Ajitdada: ,A leader who keeps his word, strives tirelessly , task,hand, builds connections with people

राजकारणात अनेक सहकारी भेटतात. त्यातील काही कायमस्वरुपी जोडले जातात, काही त्या प्रवाहाच्या कालखंडातील असतात. काहींसोबत काम करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, क्षमतेचा आणि माणुसकीचा आदर मनात निर्माण होतो. अजितदादा पवार हे माझ्यासाठी अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते.
महाराष्ट्राच्या विधानसभेत उभे राहून अजितदादांना श्रद्धांजली वाहावी लागणे, हे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि मनाला चटका लावणारे क्षण होते. महाराष्ट्राने त्यांच्या रूपाने एक सक्षम प्रशासक, अभ्यासू नेता आणि निर्णयक्षम लोकप्रतिनिधी गमावला; पण माझ्यासाठी ती एका जिवलग मित्राची झालेली हानी होती.
अजितदादांबद्दल बोलताना सर्वप्रथम आठवतो तो त्यांच्या शब्दाचा मान राखणारा स्वभाव. राजकारणात परिस्थितीनुसार भूमिका बदलणे अनेकदा अपरिहार्य ठरते. परंतु दिलेल्या शब्दाला आयुष्यभर जपणारे नेते तुलनेने कमी आढळतात. दादांच्या बाबतीत दिलेला शब्द ही केवळ राजकीय बांधिलकी नव्हती; ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होती.
2019 मधील माझा आणि अजितदादांचा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अत्यंत चर्चेचा विषय राहिला. त्यानंतर परिस्थिती बदलली, निर्णय बदलले, अनेक प्रकारचे दबाव निर्माण झाले. पण त्या संपूर्ण काळात दादांनी दाखविलेली स्पष्टता आणि प्रामाणिकता माझ्या कायम स्मरणात राहील. त्यांनी घेतलेल्या निर्णयामागे ते ठामपणे उभे राहिले. सरकार टिकले नाही, ही वेगळी बाब; पण त्या प्रसंगाने त्यांच्या बांधिलकीची आणि धैर्याची साक्ष दिली. राजकारणातील प्रत्येक निर्णयामागे केवळ गणित नसते, तर सहकार्यांविषयीची जबाबदारी आणि त्यांच्या भविष्याची काळजीही असते. दादांच्या अनेक निर्णयांमध्ये मला ही भावना प्रकर्षाने जाणवली.
त्यांच्या स्वभावातील आणखी एक ठळक गुण म्हणजे स्पष्टवक्तेपणा. त्यांच्या मनात जे असेल ते ते समोरच्याला थेट सांगत. राजकीय परिणामांची फारशी चिंता न करता आपले मत मांडण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. अनेकदा राजकारणात पॉलिटिकली करेक्ट राहणे सोपे असते; पण प्रामाणिक राहणे कठीण असते. दादांनी नेहमी प्रामाणिकपणाचा मार्ग निवडला.
विधानसभेतील सदस्य असोत, पक्षाचे कार्यकर्ते असोत किंवा प्रशासनातील अधिकारी असोत-सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल एक विश्वास होता. कारण दादा एखाद्या कामासाठी तयार झाले की ते पूर्णत्वाला नेण्यासाठी स्वतः लक्ष घालत. तात्काळ फोन करणे, सातत्याने पाठपुरावा करणे, निर्णयाची अंमलबजावणी झाली की नाही याची खात्री करणे ही त्यांची कार्यशैली होती. त्यामुळे लोक त्यांच्याकडे केवळ मंत्री म्हणून नव्हे, तर समस्या सोडवणारा नेता म्हणून पाहत.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांत प्रभावी पैलू म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा.
वेळेचा आदर म्हणजे कामाचा आदर, असे ते मानत. सकाळी नऊ वाजताची बैठक असेल तर 8.55 लाच ते आपल्या जागेवर उपस्थित असत. मंत्रालयातील अनेक अधिकारी सांगतात की अनेकदा मंत्रालयाचा दिवसच दादांच्या उपस्थितीने सुरू व्हायचा. सार्वजनिक जीवनात वेळेचे इतके काटेकोर पालन करणारी माणसे फार कमी पाहायला मिळतात.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांचा अभ्यास आणि तयारी नेहमीच लक्षवेधी असायची. प्रत्येक विषयाचा बारकाईने अभ्यास करून ते चर्चेत सहभागी होत. कोणत्याही प्रस्तावाविषयी त्यांच्याकडे स्वतंत्र नोंदी असत. विषय योग्य वाटला तर तात्काळ निर्णय आणि शंका वाटली तर सखोल चर्चा, हा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यामुळे प्रशासनात त्यांना एक सक्षम, अभ्यासू आणि परिणामकारक मंत्री म्हणून मोठा सन्मान मिळाला.
बाहेरून पाहताना दादांचा स्वभाव कडक वाटू शकतो. पहिल्या भेटीत ते समोरच्याला शिस्तीची जाणीव करून देत. पण त्यांना जवळून ओळखणार्यांना माहिती आहे की, त्या कठोरतेमागे माणसांविषयीची अपार आत्मीयता दडलेली होती. एकदा विश्वास निर्माण झाला की ते त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत.
एकत्र प्रवास करताना, बैठका घेताना किंवा निवांत गप्पा मारताना त्यांच्या अनेक छोट्या सवयी अनुभवायला मिळत. क्रिकेटवरील चर्चा असो, शेतकर्यांच्या प्रश्नांबद्दलची चिंता असो किंवा साधेपणाने जगण्याची वृत्ती असो-दादांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रामाणिकपणा कायम दिसत असे. मी शेतकर्याचा मुलगा आहे, असे अभिमानाने सांगणारा हा नेता कितीही मोठ्या पदावर पोहोचला तरी आपल्या मातीत आणि माणसांतच राहिला.
राजकीय जीवनात त्यांना 6 वेळा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. हा विक्रम त्यांच्या क्षमतेचा पुरावा आहे. परंतु त्यांच्यासोबत जवळून काम केलेल्या व्यक्ती म्हणून मी एक गोष्ट निश्चितपणे सांगू शकतो-महाराष्ट्राला अजितदादांचे नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून अनुभवता आले असते, तर राज्याला एक अत्यंत सक्षम, निर्णयक्षम आणि परिणामकारक मुख्यमंत्री लाभला असता. प्रशासनावरील पकड, निर्णयक्षमता, कार्यक्षमता आणि लोकांशी असलेले नाते या सर्व गुणांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात दादा म्हटले की काही व्यक्तिमत्त्वे कायम स्मरणात राहतील. त्या मानाच्या यादीत अजितदादांचे स्थान अत्यंत अग्रक्रमाचे आहे. त्यांनी पदे भूषवली म्हणून नव्हे, तर काम करून दाखवले म्हणून. त्यांनी सत्ता उपभोगली म्हणून नव्हे, तर जबाबदारी स्वीकारली म्हणून.
आज त्यांच्या आठवणींकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते-शिस्त, अभ्यास, स्पष्टवक्तेपणा, कार्यक्षमता आणि कामावरील निष्ठा यांचा असा संगम राजकारणात क्वचितच पाहायला मिळतो. अजितदादा हे केवळ माझे सहकारी नव्हते; ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण अध्याय होते. हा अध्याय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम आदराने, अभिमानाने आणि कृतज्ञतेने स्मरणात राहील.
अजितदादा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी येतो, हा एक दुर्मिळ योगायोग. गेली अनेक वर्षे वाढदिवसाच्या दिवशी त्यांचा मला हमखास फोन यायचा. मुख्यमंत्रीसाहेब, वाढदिवसाच्या शुभेच्छा, असे ते म्हणत आणि मीही त्यांना मनापासून शुभेच्छा देत असे. ही शुभेच्छांची छोटीशी देवाणघेवाण आमच्या नात्यातील आत्मीयतेचे प्रतीक होती. यावर्षी मात्र तो फोन येणार नाही. ती उणीव कायम जाणवत राहील. पण आठवणींच्या रूपाने त्यांचा आवाज, त्यांचे हसणे, त्यांचा स्पष्ट स्वभाव आणि कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा सदैव सोबत राहील.
दादा, आज आपल्यात नाहीत; पण त्यांनी उभे केलेले कार्य, जपलेली मूल्ये आणि निर्माण केलेला विश्वास कायम जिवंत राहील. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी त्यांच्या कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
अजितदादांची आठवण ही केवळ स्मृती नाही, तर प्रेरणा आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
– देवेंद्र फडणवीस





