Ajit Pawar plane crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतच्या वृत्तामुळे बारामती शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती पसरताच अनेक कार्यकर्ते आणि नागरिक शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात जमा झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता काही व्यापाऱ्यांनी खबरदारी म्हणून दुकाने बंद ठेवली. आजूबाजूच्या गावांतूनही नागरिक बारामतीकडे दाखल होत असल्याने शहरात गर्दी वाढली होती. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासनाकडून नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Ajit Pawar पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितले की, संबंधित घटनेबाबत तांत्रिक तपास सुरू असून काही मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र मृतांची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही. अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच तपशील स्पष्ट होऊ शकणार आहे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, सध्या कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासन आणि यंत्रणा सतर्क असून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.