Aasha Pawar : अजित पवारांच्या मातोश्री आशा पवारांचे विठ्ठलाकडे साकडे ; शरद पवार, अजित पवार एकत्र येणार ?

पंढरपूरः नव्या वर्षाची सुरूवात देवदर्शनाने करण्यासाठी राज्यात असलेल्या प्रमुख मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. नव्या वर्षाची सुरूवात देवदर्शनाने करणाऱ्यांमध्ये काही महत्वाच्या व्यक्तींचा देखील समावेश असतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जात दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत केलेले विधान राज्यात चर्चेली जात आहे. त्यांनी पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरावरून शरद पवार आणि अजित पवार २०२५ मध्ये एकत्र येणार असल्याची चर्चा केली जात आहे.
आज सकाळी आशा पवार या पंढरपूर येथील विठ्ठल मंंदिरात देवदर्शनासाठी आल्या होत्या. त्या दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपण श्री विठ्ठल रुक्मिणीकडे सर्वांना सुखी ठेव असे साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी पवार कुटुंबीय एकत्र यावे, अशी इच्छा देवाकडे व्यक्त केली असल्याचे सांगितले. पुढे त्या म्हणाल्या, सगळे वाद संपू दे असे देखील पांडुरंगाला सांगितले आहे. भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावे का? असा प्रश्न विचाराताच आशा पवारांनी होय उत्तर दिले. पुढे पांडुरंग तुमचं ऐकणार, असे विचारल्यावर आशा पवार यांनी हात जोडत, होय, होय ऐकणार अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी दिलेल्या या प्रतक्रियेची राज्यात चर्चा होत आहे.





