पिंपरी | आरपीआयचे शिष्टमंडळ घालणार अजित पवारांना साकडे

पिंपरी,(प्रतिनिधी) – अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या जागचेी रस्सीखेच वाढली आहे. ही जागा आरपीआय आठवले गटाला सोडावी, या मागणीकरिता महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे शहर व प्रदेश पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत.
याकरिता अजित पवार यांची भेट घेण्याचे नियोजन केले जात आहे. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघात सर्वच राजकीय पक्षात दिवसेंदिवस इच्छूकांची संख्या वाढत आहे. राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर महायुतीमधील घटक पक्ष असलेला आरपीआय हा पिंपरी विधानसभेच्या जागेकरिता आग्रही आहे.
या मतदार संघात आरपीआयची ताकद असून, या मतदार संघात विजय मिळविण्याचा पदाधिकार्यांना विश्वास वाटत आहे.
दरम्यान, महायुतीच्या जागा वाटपात प्रदेश पातळीवरील पदाधिकार्यांनी भाजपकडे केलेल्या जागांच्या मागणीमध्ये पिंपरी मतदार संघ अग्रक्रमावर आहे.
तर महायुतीच्या जागा वाटपात काही ठिकाणी होणार्या जागा बदलाचा फायदा पिंपरी विधानसभेत होईल, अशी पदाधिकार्यांना आशा आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आण्णा बनसोडे हे या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असून, आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदाराला याठिकाणी संधी मिळण्याचा जागा वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे.
या बाबीची आरपीआयला काहीशी अडचण होत आहे. या जागेचे दावेदार असलेले भाजप पदाधिकारी अमित गोरखे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतर हा मतदार संघ आरपीआयलाच मिळणार असल्याचे बोलले जात होते. त्याकरिता भाजप व आरपीआय पदाधिकार्यांची बैठकही झाली आहे.
आठवलेदेखील पिंपरीसाठी आग्रही
आता सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जागांवर उमेदवार ठरविण्यावर सर्वच राजकीय पक्षांचा कल आहे. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेदेखील आपले राजकीय वजन वापरून हा मतदार संघ आरपीआयला मिळावा, याकरिता वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर शहर व प्रदेश पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.18) आठवले यांची मुंबईत भेट घेतली.
या भेटीदरमन झालेल्या चर्चेत भाजपच्या वरिष्ठ पातळीवर पिंपरी विधानसभा मतदार संघाची मागणी केली जात असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेदेखील मन वळविण्यासाठी त्यांची भेट घेण्याची सूचना आठवले यांनी या शिष्टमंडळाला केली त्यानुसार अजित पवार यांच्या भेटीचे नियोजन केले जात आहे.
या शिष्टमंडळात पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सिकंदर सूर्यवंशी, सम्राट जकाते, माजी स्वीकृत सदस्य राजेंद्र कांबळे,
सरचिटणीस दयानंद वाघमारे, योगेश भोसले, संभाजी वाघमारे, अक्षय दुनघव, बापू सरोदे, दिलीप थोरात, संदीप तोरणे, अतुल जाधव, कृष्णा जाधव, राजू गायकवाड, कमल कांबळे, लता लगाडेयांचा समावेश होता.





