शेवगाव, (प्रतिनिधी)- राज्यात महायुतीसोबत आरपीआयची (आठवले गट) युती असून आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी युती करताना सत्तेत १० टक्के वाटा मागितला असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही. शासकीय कार्यक्रम होताना महायुतीतल्या तिन्ही पक्ष नेत्यांचे फोटो छापले जातात. मात्र, आठवलेंचा फोटो छापला जात नाही. त्यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी असून, आगामी काळात पक्षाच्या कार्यकर्तास सन्मानाने वागविले नाही तर विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद निश्चित उमटतील, असा इशारा आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांनी दिला. पाथर्डी – शेवगाव मतदारसंघातील आरपीआयच्या प्रमुख कार्यकर्त्यांची विधानसभा निवडणुकीसंदर्भात मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षपदावरून वाकचौरे बोलत होते. तालुकाप्रमुख सतिष मगर, पाथर्डी तालुकाप्रमुख बाबा राजगुरू, मार्केट कमेटीचे संचालक रवी आरोळे, रमेश शिरकाडे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुनिल अहुजा उपस्थित होते. वाकचौरे म्हणाले ,आरपीआयची राज्यातील भाजपबरोबर असलेली युती ही केवळ फक्त राजकीय असून सामाजिक व धार्मिक कामात त्याचा काडीमात्रही संबंध येत नसल्याचे सांगून ज्या ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत, ते आरपीआयच्या स्थानिक कार्यकर्त्यांना कधीच विश्वासात घेत नाहीत. महायुतीच्या होणाऱ्या कार्यक्रमालाही बोलावले जात नसल्याने कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिर्डी लोकसभेची जागा आठवलेंना द्या, अशी मागणी करूनही ती जागा न दिल्याने जिल्ह्यातील नाराज कार्यकर्त्यांनी दोन्हीही जागेवरचा निकाल दाखवून दिला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच मतदारसंघात आरपीआयचा मोठा मेळावा घेऊन पक्षाची पुढील दिशा ठरवली जाईल.आठवले गटास १० जागा द्याव्यात. त्याही निवडून येतील, अशा जागा हव्यात, असेही ते म्हणाले . प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले , महायुतीकडून आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही तर आम्ही महायुतीच्या जिल्ह्यातील सर्व जागा निवडून येण्यापासून रोखू, असा इशारा देत निवडणूक आली की, आम्हाला भावनिक करायचे आणि आमची एकगठ्ठा मते मिळवायची हे आता आम्हास समजले असल्याने येथून पुढच्या काळात निवडणूक विचाराने हाताळावी लागेल. तालुकाप्रमुख सतीश मगर,पाथर्डी तालुकाप्रमुख बाबा राजगुरू, मार्केट कमेटीचे संचालक रवी आरोळे,रमेश शिरकाडे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील अहुजा यांनीही आपले विचार व्यक्त करून स्थानिक आमदाराबाबत नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. या वेळी गणेश साळवे, राजेंद्र मगर, कडू मगर, निरंजन बोरुडे, प्रदीप मोहिते, राकेश गरुड, अमोल आहेर, राजू घुटे, निलेश जगधणे, बाबासाहेब खिल्लारे, विठ्ठल मगर, शांतवन गरुड, महेश अंगरखे, विकास मगर, अमोल धस, सुरेश शिंदे, अमोल गजभिव, अजय जगधने, हर्षद मगर, दत्ता पाटील, भारत गजभिव, अभिषेक मगर, अमोल वाघमारे, राहुल भिसे, अशोक आहेर, सचिन आहेर यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. गौरव मगर यांनी प्रास्ताविक केले . सूत्रसंचालन महेश अंगरखे यांनी केले तर रवी आरोळे यांनी आभार मानले आहेत.