“तीन पक्षांचे शेत नांगरुन दिले, पण…”; मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत

Sadabhau Khot | राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरमधील राजभवनात पार पडला. यावेळी महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीतील नाराजीनाट्य समोर येत आहे. भाजप, शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळालं.
भाजपचे मित्र पक्षांमध्ये देखील नाराजीचं वातावरण आहे. विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. नांगरणीसाठी जी बैलगाडी वापरली गेली ती बैल बाजूला करुन ठेवली असल्याची खंत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
“मित्र पक्षाना सामावून घेणे हे तिन्ही पक्षांनी गरजेचे होते. एका पक्षाने घेतले पाहिजे, असे मी म्हणणार नाही. तिन्ही पक्षांनी मित्र पक्षांसाठी काही मंत्रिपदे बाजूला काढायला पाहिजे होती. परंतू दुर्देवाने तसे झाले नाही. गावगाड्यामध्ये पैरा केला जातो, त्याप्रमाणं दुर्दैवानं काही झालं की आम्ही तीन पक्षांचं शेत नांगरुन दिलं. पण आमचं शेत नांगरायची वेळ आली तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले. आम्ही मात्र शेतात उभे आहोत. मात्र, प्रामाणिकपणे महायुतीसोबत उभे आहोत,” असे ही यावेळी सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
मंत्रिपद वाटप करताना काही मर्यादा असल्याचेही त्यांनी मान्य केले. “२४० लोक आपले निवडून आले आहेत, मंत्रिपदं देण्याला काही मर्यादा होत्या. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, कालांतरानं ही सगळी मंडळी कामात येतील. शेतकरी एखाद्या वर्षी शेत पिकलं नाही म्हणून पेरणी करायचं थांबत नाही. दुसऱ्या वर्षी पेरणी होतीय का हे बघत राहायचं,” असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
दरम्यान, सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना भाजपनं विधानपरिषदेवर संधी दिली होती.
कोणते नेते नाराज ?
रामदास आठवले यांनी देखील आपली नाराजी जाहीर केली. त्यांच्या पक्षाला देखील मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती.तर युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा देखील नाराज असल्याचं समोर आलं आहे. ते अधिवेशन सोडून अमरावतीला परतल्याची माहिती आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत देखील मंत्रिपद न मिळाल्यानं खदखद पाहायला मिळाली. नरेंद्र भोंडेकर यांनी वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, असं म्हटले. प्रकाश सुर्वे यांची नाराजी देखील लपून राहिली नाही. तानाजी सावंत देखील नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
हेही वाचा:





