पुणे | …तर महायुतीमधील तीन्ही पक्षांना फायदा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आगामी विधानसभेत रिपाइंला योग्य प्रतिनिधित्व मिळाल्यास तीनही पक्षांना फायदा होईल. त्यामुळे महायुतीने याचा नक्की विचार करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी आम्हाला अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. मंगळवारी पुणे दौऱ्यावर असलेल्या आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
आठवले म्हणाले की, जर आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळाल्यास त्याचा फायदा महायुतीमधील तीनही पक्षांना निश्चित होईल, लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित जागा प्राप्त झाल्या नाहीत.
संविधान बदलाचा मुद्दा विरोधकांनी जोरदारपणे लावून धरल्यामुळे जनतेत एक वेगळा संदेश गेला. तसेच, मराठा आंदोलनाचाही फटका महायुतीला बसला होता. परंतु, आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र उलटे दिसून येईल.





