Ajit Pawar : ‘हे’ तंत्रज्ञान आलंय,पायलट आता निवांत असतात…अजितदादांचे ‘ते’ शब्द ठरले काळजाचा ठोका चुकवणारे!
Ajit Pawar : तंत्रज्ञानाविषयीची ती आपुलकी ठरली जीवघेणी; पत्रकारांशी संवाद साधताना दादांनी व्यक्त केलेला तंत्रज्ञानावरील विश्वास.

Ajit Pawar – आता एआय तंत्रज्ञान आले आहे. पूर्वी आम्हाला कुठे लवकर जायचं असलं की हेलिकॉप्टरने जायचो. त्यामध्ये बसून खाली बघितलं की आता खाली पडतोयं की काय अस वाटायचं. मात्र, आता तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. आमचे पायलट लोकेशन टाकतात आणि निवांत गप्पा मारत बसतात…हे शब्द होते विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अजित पवार यांचे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना अजित पवार यांनी त्यांच्या विमान प्रवासाबद्दल माहिती सांगितली होती. ज्या टेक्नोलाॅजीविषयी आपुलकी होती, ती टेक्नोलाॅजी त्यांना वाचवू शकली नाही.पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक अजितदादा यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यासाठी त्यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये पत्रकार परिषद आणि सभांचा धडाका लावला होता.
तसेच पत्रकारांसोबत ८ जानेवारीला अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी त्यांनी नवीन तंत्रज्ञान व त्यांच्या विमान प्रवासाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. अजितदादा म्हणाले होते, ‘‘दिवसेंदिवस तंत्रज्ञान प्रगती करत आहे. आम्ही पूर्वी सभांना फिरायचो, तेव्हा हेलिकॉप्टरने जायचो. मधुकर पिचड यांच्या सभेला अकोल्याला जायचं असल की हेलिकॉप्टर कुठेतरी जुन्नरला जायचं. मग वरून साहेब बघायचे आणि अंदाजाने सांगायचे की हे अकोले नाही तर जुन्नर आहे.
मग पुन्हा अकोलेच्या दिशेने हेलिकॉप्टर अंदाज घेत निघायचे. त्या हेलिकॉप्टरमध्ये फक्त दोघांना बसता यायचे. खाली बघितले की भीती वाटायची आता पडतयं की काय? मात्र, आता तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे, आता एआयचा वापर केला जात आहे. विमानांमध्ये आता दोन पायलट असतात. एकदा विमान चालू केल वर गेल की पायलट लोकेशन टाकतात. त्यानंतर ते निवांत गप्पा मारत बसतात.’’हीच टेक्नॉलॉजी असलेल्या विमानाने अजितदादा नेहमी प्रवास करत. शेवटी याच टेक्नॉलॉजीने त्यांचा घात केला असल्याचे दुर्देवाने म्हणाव लागेल.





