Ajit Pawar : अजित पवारांची चढ -उताराने भरलेली कारकीर्द; मात्र ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण !
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) यांचे आज सकाळी बारामतीजवळील विमान अपघातात दुःखद निधन झाले.

Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) यांचे आज सकाळी बारामतीजवळील विमान अपघातात दुःखद निधन झाले.
वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
अजित पवार (Ajit Pawar) हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून खासगी Bombardier Learjet 45 विमानाने बारामतीकडे निघाले होते. विमानाने सकाळी सुमारे ८:१० वाजता मुंबईतून उड्डाण केले आणि बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या अटेम्प्टमध्ये रनवेवरून बाजूला गेले आणि क्रॅश झाले.
यानंतर भीषण स्फोटासह विमानाला आग लागली. विमान पूर्णपणे जळून खाक झाले असून, अपघाताच्या ठिकाणी अनेक स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि दोन पायलट कॅप्टन सुमित कपूर व कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश आहे.
Directorate General of Civil Aviation (DGCA) आणि Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) ने या अपघाताचा तपास सुरू केला असून, प्राथमिक माहितीनुसार दुसऱ्या लँडिंग अटेम्प्टदरम्यान हा अपघात झाला. विमान १६ वर्षे जुने असल्याचेही समोर आले आहे.
मुख्यमंत्री बनण्याची इच्छा राहिली अपूर्ण
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि अनुभवी नेते होते. त्यांनी ६ वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले होते. ते स्वतः मिश्किलपणे म्हणायचे की, “उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड मीच केला.” मात्र, त्यांची एक मोठी इच्छा अधुरी राहिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची. अनेकदा त्यांनी ही इच्छा उघडपणे व्यक्त केली होती, पण राजकीय परिस्थितीमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही.
अजित पवार यांची राजकीय कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली होती. ते स्पष्टवक्ते, शिस्तबद्ध आणि विकासपुरुष म्हणून ओळखले जायचे. बारामती आणि पिंपरी-चिंचवडसारख्या भागात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आणि सिंचन प्रकल्पांसाठी त्यांचे योगदान अतुलनीय राहिले. ते वेळेचे पालन करणारे नेते होते. कार्यक्रमांना उशिरा पोहोचण्याची सवय नसलेले. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप अशा विविध पक्षांच्या सरकारांमध्ये त्यांनी काम केले आणि सर्वांशी राजकीय संबंध राखले.
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्य सरकारने तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला असून, उद्या (२९ जानेवारी) बारामतीत विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा : Ajit Pawar : मोठं नुकसान झालं, यात कुठेही राजकारण नाही..! अजित दादांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया






