Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अजित पवारांचं मोठं विधान, सुप्रिया सुळेंच्या मंत्रिपदावरही भाष्य

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी नेते एकत्र दिसल्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळालं होतं. मात्र, या सर्व चर्चांवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार नाही आणि खासदार सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाहीत, असं अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना ठामपणे सांगितलं. सुप्रिया सुळे यांचा पक्ष इंडिया आघाडीचा घटक असल्यामुळे त्या केंद्र सरकारमध्ये सहभागी होण्याचा प्रश्नच येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
निवडणुकीनंतर पुण्यात भाजपसोबत जाणार का, असा प्रश्न वारंवार विचारला जात असतानाही अजित पवारांनी यावर थेट उत्तर देणं टाळलं. दरम्यान, ‘मैत्रीपूर्ण लढत’ या विषयावर भाजपकडून होणाऱ्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. “मी स्वतः लढत असताना ती लढत मैत्रीपूर्ण कशी असेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपला सत्ता गमावण्याची भीती : अजित पवार
अजित पवार म्हणाले की, “आमच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांना पुण्यातील सत्ता गमावण्याची भीती वाटते. मुख्यमंत्री म्हणतात की 15 तारखेनंतर महायुती अभेद्य राहील. मात्र, मी पुणेकरांना सांगतो सकाळी लवकर उठा, अलार्म बंद करा आणि मतदान केंद्रावर जाऊन घड्याळाच्या बटनावरच मतदान करा.”
पुण्यात अजित पवारांचा जोरदार रोड शो
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ताकद दाखवत जोरदार रोड शो केला. नऱ्हे-आंबेगाव परिसरातील प्रभागांमध्ये काढलेल्या प्रचार रॅलीत त्यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला.




