प्रभात वृत्तसेवा पुणे – शहराची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी, तसेच नागरिकांना पेट्रोलवर जादा पैसे खर्च करावे लागू नयेत, यासाठी मेट्रोचा आणि बसचा प्रवास मोफत देणार असल्याचे आश्वासन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिरनाम्याद्वारे पुणेकरांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आधीच तोट्यात असलेली पीएमपीएमएल आणि महापालिकेच्या आर्थिक गणिताची सोडवणूक करून हा मोफत प्रवास कसा देणार, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मात्र पवार या वेळी देऊ शकले नाहीत.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, प्रभारी शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, आमदार सुनील टिंगरे आदी उपस्थित होते. नळाद्वारे दररोज पाणी, ट्रॅफिक आणि खड्डेमुक्त शहर, नियमित स्वच्छता, हायटेक आरोग्य सुविधा, प्रदूषणमुक्त शहर, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आदींचे आश्वासन दोन्ही राष्ट्रवादींनी पुणेकरांना दिले आहे.नळाद्वारे दररोज पाणी देण्याची घोषणा जाहिरनाम्यात केली आहे. परंतु जलसंपदा विभागाकडून पुणे शहराच्या पाण्याच्या वाढीव कोट्याच्या वर्षानुवर्षाच्या मागणीविषयी विचारले असता, पुणेकरांच्या दरडोई अतिरिक्त पाणीवापराबाबत पवार यांनी सांगितले. याविषयात चर्चा करण्यात येईल, माहिती घेण्यात येईल. असे मोघम उत्तर पवार यांनी दिले. मोफत प्रवासाचे गणित वाहतूक कोंडीत वाहने अडकल्यामुळे पेट्रोलवर मोठा खर्च होतो. कोंडीमुळे रोज ३० कोटींचे पेट्रोल अनावश्यकपणे जळत असते. महिन्याला ९०० कोटींचे अनावश्यक पेट्रोल वाया जाते. याच हिशोबाने वर्षाला १० हजार ८०० कोटींचे पेट्रोल असेच जळते. त्यामुळे मेट्रो, बसचा प्रवास मोफत दिल्यास हे पैसे वाचतील. ते पैसे मेट्रो आणि पीएमपीएमला देता येतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, सध्या पीएमपीएमएलला होणारा तोटा भरून काढण्यासाठी दोन्ही महापालिकांवर मोठा आर्थिक ताण आहे, राज्याकडून अनुदानही वेळेत मिळत नाही, असे असताना या सेवा मोफत देणे किती संयुक्तिक आहे, याविषयी विचारले असता पवार समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. आम्ही निवडणूक लागण्याआधीच तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले.